Deepti Sharma T20 World Record India Asia Cup: महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने ९४ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचा श्रीगणेशा केला. शफाली वर्मा व दीप्ती शर्मा भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. यादरम्यान दीप्तीने सामन्यात कमालीची गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या आणि या कामगिरीच्या बळावर दीप्तीने महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याच गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती.

भारत आणि थायलंड यांच्यात महिला टी-२० आशिया चषकातील सामना ३० ऑगस्टला खेळवला गेला. हा सामना टीम इंडियाची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा हिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. तिच्या कारकिर्दीतील हा १५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) सामना होता आणि या सामन्यादरम्यान तिने एक नवा विक्रम केला. या कामगिरीसह, थायलंडची फिरकीपटू थिपचा पुत्तावोंग हिचा विक्रम मोडीत काढून ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली आहे. थायलंडविरुद्धच्या या सामन्यात दीप्तीने केवळ सात चेंडूंमध्ये तीन बळी घेतले.

महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच गोलंदाज

महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा अव्वल स्थानावर आहे; तिने १५० सामन्यांत १७१ बळी घेतले आहेत. थायलंडची थिपचा पुत्तावोंग दुसऱ्या स्थानावर असून तिने १०९ सामन्यांत १७० बळी घेतले आहेत. रवांडाची हेन्रिएट इशिम्वे तिसऱ्या स्थानावर आहे, जिने १३४ सामन्यांत १६४ बळी घेतले आहेत. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन चौथ्या स्थानावर असून तिने आतापर्यंत ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १५४ बळी घेतले आहेत.

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी, दीप्ती आणि थिपाचा या दोघीही प्रत्येकी १६८ बळींसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होत्या. त्यानंतर, हाँगकाँगविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात एक बळी घेत थिपाचाने दीप्तीला मागे टाकलं आणि पहिलं स्थान पटकावलं. भारताच्या सामन्यात तिने आणखी एक बळी घेतला, ज्यामुळे तिची एकूण बळींची संख्या १७० वर पोहोचली. मात्र, थायलंडविरुद्धच्या सामन्यात तीन बळी घेत दीप्ती शर्माने थिपाचाला मागे टाकलं; तिने ही कामगिरी केवळ ७ चेंडूत करून दाखवली. म्हणजेच थायलंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्माने ७ चेंडूत एकही धाव न देता ३ बळी घेतले.

भारत महिला आणि थायलंड महिला संघ यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने ९४ धावांनी दणदणीत विजय मिळवत आशिया चषक मोहिमेची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, थायलंडचा महिला संघ १६.१ षटकांत ६५ धावांत सर्वबाद झाला. शफाली वर्माने ३६ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली आणि तिच्या या कामगिरीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.