Deepti Sharma Creates History in Womens Cricket: दीप्ती शर्माने महिला क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं आहे. महिला टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्माने एक विकेट घेत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दीप्तीने झुलन गोस्वामीचा विक्रम मोडत पहिलं स्थान गाठलं आहे. महिलांच्या क्रिकेट इतिहासात आजवर अशी कामगिरी कोणतीच खेळाडू करू शकलेली नाही.

भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना करो या मरो आहे. या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह कर्णधार हरमनप्रीत कौरच्या २५ चेंडूत अर्धशतकासह संघाने १७० धावा केल्या. स्मृती मानधना व शफाली वर्माच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करून दिली होती.

दीप्ती शर्मा ऑस्ट्रेलियाच्या डावातील १०वं षटक टाकण्यासाठी आली आणि तिने पहिल्याच चेंडूवर बेथ मुनीला बाद करत संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवला. राधा यादवने शानदार झेल टिपत दीप्ती शर्माच्या या विक्रमात मोठी भूमिका बजावली. गेल्या दोन सामन्यात दीप्ती शर्माला एकही विकेट मिळाली नव्हती. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही विकेट मिळवत तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे.

दीप्ती शर्मा सर्वाधिक ३५६ विकेट्ससह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर भारताची झुलन गोस्वामी ३५५ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने ३३६ विकेट्स, इंग्लंडच्या सायव्हर-ब्रंटने ३३५ विकेट्स, इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टनने ३३३ विकेट्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनम इस्माईलने ३२३ विकेट्स घेतल्या आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी

३५६ – दीप्ती शर्मा (भारत)
३५५ – झुलन गोस्वामी (भारत)
३३६ – एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
३३५ – कॅथरीन सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
३३३ – सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
३२३ – शबनीम इस्माईल (दक्षिण आफ्रिका)

दीप्ती शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १६८ बळी घेतले आहेत. तिने कसोटी सामन्यांमध्ये २२ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १६६ बळी मिळवले आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर फीबी मोल्केनबोअरला बाद करून दीप्तीने झुलन गोस्वामीच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवत महिला टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये जाण्यास अपयशी ठरला आणि स्पर्धेतून बाहेर झाला.