Deepti Sharma World Record IND W vs PAK W: भारताच्या लेकींनी महिला टी-२० विश्वचषक २०२६ ला दणक्यात सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाचा तब्बल ६४ धावांनी पराभव केला. भारताच्या या दमदार विजयाची शिल्पकार ठरली दीप्ती शर्मा. भारताची सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या दीप्ती शर्माने या सामन्यात ५ विकेट्स घेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दीप्तीच्या जादुई फिरकीच्या बळावर पाकिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. यादरम्यान दीप्ती शर्माने २ मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.

बर्मिंगहममध्ये झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाला चांगली सुरूवात करता आली, यानंतर संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मानधना यांनी संघाचा डाव सावरत ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्मृतीने ४४ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली, तर कॅप्टन ३६ धावा करत बाद झाली. यानंतर ऋचा घोषने आपल्या फिनिशर अंदाजाच १७ चेंडूत ३४ धावा करत भारताला १७० धावांपर्यंत नेलं.

भारताने दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दीप्ती शर्मानेच संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. दीप्तीने पाकिस्तानविरुद्ध ४ षटकांत केवळ १० धावा देऊन ५ बळी घेतले. या कामगिरीसह, महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद तिने केली आहे. तिने रेणुका सिंग आणि प्रियांका रॉय यांना विक्रम मागे टाकलं. रेणुका सिंगने २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५ धावांत ५ बळी घेतले होते, तर प्रियांका रॉयने २००९ मध्ये १६ धावांत ५ बळी घेतले होते.

दीप्ती शर्माने या अविस्मरणीय कामगिरीसह, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी (विकेट्स) घेण्याचा मान मिळवला आहे. थायलंडच्या पुथावोंग (१६५ बळी) यांना मागे टाकत, तिने आता १४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६६ बळींसह जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. याव्यतिरिक्त, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा गाठणारी पहिली फिरकी गोलंदाज ठरून दीप्ती शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

दीप्ती शर्मा – १६६ विकेट्स
थिपाचा पुथावोंग – १६५ विकेट्स
हेनरिट इशिवामे – १६० विकेट्स
मेगन शट – १५२ विकेट्स
ओनिचा कासचोम्फू – १४८ विकेट्स

पाकिस्तानविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दीप्ती शर्माला ‘सामनावीर’ हा किताब देण्यात आला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दीप्ती आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने हा पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान, हरमनप्रीत कौर चार पुरस्कारांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर त्यानंतर मिताली राजचा क्रमांक लागतो, जिने हा पुरस्कार तीनदा जिंकला आहे.