ऋषिकेश बामणे

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या बलाढय़ संघांना त्यांच्याच भूमीत धूळ चारणाऱ्या भारताचे आफ्रिकन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न ३० वर्षांनंतरही अधुरेच राहिले. या मानहानीकारक पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून अन्य खेळाडूंच्या कामगिरीचाही पंचनामा सुरू आहे.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने सेंच्युरियनची कसोटी सहज जिंकून सरत्या वर्षांला दिमाखात निरोप देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु नव्या वर्षांत कर्णधार डीन एल्गरच्या आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि केप टाऊन येथील कसोटी सामने जिंकत २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. तिन्ही सामन्यांत आफ्रिकेने नाणेफेक गमावली, तर अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे १९९२ पासून आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारताची मालिकाविजयाची प्रतीक्षा कायम आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची तुलना करायची झाल्यास भारतीय संघ आफ्रिकेपेक्षा कौशल्य आणि अनुभवाच्या बाबतीत वरचढ असल्याचे दिसून येते. मात्र तरीही मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात भारताचे रथी-महारथी अपयशी ठरले. या पराभवानंतर काही खेळाडूंच्या संघातील स्थानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला लवकरच कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

भारताच्या पराभवामागील प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांचे अपयश. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीच्या सुमार कामगिरीचा भारताला फटका बसला. वाँडर्स येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकांव्यतिरिक्त रहाणे-पुजारा संपूर्ण मालिकेत चाचपडताना दिसले. पुजाराने गेल्या तीन वर्षांत एकही शतक नोंदवलेले नाही, तर रहाणेने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत अखेरचे शतक साकारले होते. या दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही छाप पाडू न शकल्यामुळे मुंबईकर रहाणेने कसोटी उपकर्णधारपदही गमावले आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने या दोन्ही खेळाडूंच्या भवितव्याबाबत बोलण्यास नकार देताना निवड समितीला विचारण्याची सूचना केली. आता श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांसारखे असंख्य पर्याय उपलब्ध असताना रहाणे-पुजारा या दोन्ही ३३ वर्षीय खेळाडूंवर निवड समिती आणखी किती काळ भरवसा ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील विसंवाद उघडकीस आला. याचा परिणाम कोहलीसह संघातील अन्य खेळाडूंच्या मानसिकतेवर जाणवला. कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही काढून घेत रोहित शर्माची मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांसाठी कर्णधारपदी नियुक्ती केली. मात्र दुखापतीमुळे रोहित संपूर्ण दौऱ्याला मुकल्यामुळे राहुलकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपद सोपवण्यात आले. त्यातच कोहलीने पाठदुखीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यामुळे राहुलच्या खांद्यावर अनपेक्षितपणे नेतृत्वाची जबाबदारी पडली. दुसऱ्या डावात २४० धावांचा बचाव करताना कर्णधार म्हणून कोहलीची अनुपस्थिती भारताला प्रकर्षांने जाणवली. आता पुढील काही दिवसांतच सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत राहुल संघाचे नेतृत्व करेल. अशा स्थितीत कोहलीचा अनुभव त्याच्यासाठी मोलाचा ठरेल.

दर्जेदार फलंदाज कोहलीसाठी ही मालिका साधारण ठरली. केप टाऊन कसोटीच्या पहिल्या डावात ७९ धावांची खेळी उभारताना कोहलीने नैसर्गिक वृत्तीविरुद्ध धिमा खेळ केला. २०१९पासून एकही शतक झळकावू न शकलेल्या कोहलीला या मालिकेत टीकाकारांची तोंडे बंद करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु उजव्या यष्टीबाहेरील चेंडूला छेडणे कोहलीला अद्यापही महागात पडत आहे. याव्यतिरिक्त, सलामीवीर मयांक अगरवालचे विदेशी खेळपट्टय़ांवरील तंत्र, रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत रविचंद्रन अश्विनचे अष्टपैलुत्व आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या चौकटीत आढळणारा सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असे अनेक मुद्देही भारतासाठी हानीकारक ठरले. आता फेब्रुवारीअखेरीस भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत भारत पाचव्या स्थानी घसरला असून अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी त्यांना प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत. त्याआधी, संघरचनेची घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे.