दुबई : फिरकीपटूंच्या धिम्या गतीने वळणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचे मोठे आव्हान फलंदाजांपुढे असते. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बचाव हाच आक्रमणाचा सर्वोत्तम मार्ग असतो, असा सल्ला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनने फिरकी गोलंदाजांना दिला आहे.

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकदा गोलंदाजाला बळी मिळत नाही, असे कसोटी (८०० बळी) आणि एकदिवसीय (५३४ बळी) क्रिकेट प्रकारांमध्ये सर्वाधिक बळी नावावर असणाऱ्या मुरलीधरनने म्हटले आहे.

‘‘कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळी मिळवणे, हेच लक्ष्य असते. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बचाव हाच आक्रमण असतो, हे रुजल्यास प्रतिषटकास ६ किंवा ६.५ धावांपर्यंत फलंदाजाला रोखायला हवे. गोलंदाजाला हे साध्य झाल्यास किमान दोन बळी त्याच्या खात्यावर सहजपणे असतात. खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेरक म्हणून मी याच दृष्टिकोनातून पाहतो,’’ असे मुरलीधरनने सांगितले.

‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांवर फलंदाजांकडून मोठय़ा प्रमाणात हल्लाबोल होईल, असे सुरुवातीच्या काळात म्हटले जायचे. परंतु कालांतराने गोलंदाजी जितकी धिमी, तितकी त्याला सामोरे जाणे अवघड असते, हे सिद्ध झाले आहे.’’ असे विश्लेषण मुरलीधरनने केले आहे.

श्रीलंकेच्या कामगिरीत घसरण!

श्रीलंकेला ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडून अव्वल-१२च्या दुसऱ्या फेरीत पोहोचता येणार आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत श्रीलंकेची कामगिरी घसरली आहे. पण संघात क्षमता असलेले खेळाडू आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडू शकतील, अशी आशा आहे, असे मत मुरलीधरनने व्यक्त केले आहे.