आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) मान्यता काढून घेतल्यानंतर भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) काहीसा वैफल्यग्रस्त झाला आहे. आता आयएबीएफने पुरुष आणि महिलांसाठी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्याचा घाट घातला आहे. मात्र या खटाटोपानंतरही आयएबीएफला आम्ही मान्यता देणार नाही, असे एआयबीएने स्पष्ट केले आहे.
माजी अध्यक्ष अभयसिंग चौटाला यांच्या गटाने विविध राज्य संघटनांना आपल्याकडे वळवण्यासाठी १८ ते २३ मे दरम्यान हैदराबादमध्ये पुरुषांची तर ८ ते ११ मेदरम्यान नवी दिल्लीत महिलांची स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या स्पर्धेतून २३ ते ३ ऑगस्टदरम्यान ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ निवडण्याचे जाहीर केले आहे. मात्र एआयबीए आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भारताची मान्यता बरखास्त करण्यात आल्यामुळे ही स्पर्धा ग्राह्य़ धरता येणार नाही, असे एआयबीएने स्पष्ट केले आहे. ‘‘भारतात होणाऱ्या कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेला मान्यता देण्यात येणार नाही,’’ असे एआयबीएचे प्रसिद्धीप्रमुख संचालक सेबॅस्टियन गिलोट यांनी म्हटले आहे.
एआयबीएच्या भूमिकेमुळे भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ अडचणीत सापडला असून या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चौटाला गटाने २४ मार्चला नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्याचे ठरवले आहे.