WPL 2025, Gujarat Giants vs Delhi Capitals: महिला प्रिमियर लीग २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ७ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह दिल्ली कॅपिटल्सने चौथ्यांदा स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या लिजेल ली ने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार आणि १ षटकार मारला. तर शफाली वर्माने २१ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार मारले. धावांचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रिग्जने कॅप्टन्सी इनिंग केली. तिने २३ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ४१ धावांची खेळी केली. तर लॉरा वोल्वार्ड्टने नाबाद खेळी करून दिल्लीला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सने ७ गडी बाद १६७ धावा केल्या. गुजरात जायंट्कडून सलामीला फलंदाजी करताना बेथ मुनीने ५१ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ६ चौकार मारले. सोफी डिवाईन आणि अनुष्का शर्मा या महत्वाच्या सामन्यात मोलाचं योगदान देऊ शकले नाहीत. कर्णधार ॲशले गार्डनर शून्यावर माघारी परतली. शेवटी वेअरहॅमने ३५ धावा कुटल्या. या खेळीच्या बळावर गुजरात जायंट्सने ७ गडी बाद १६८ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश

दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या तिन्ही हंगामात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिन्ही हंगामात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी दिल्लीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. यावेळी तरी दिल्लीचा संघ बाजी मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.