पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या ६ सामन्यांमध्ये पंजाबने लागोपाठ ६ विजय मिळवले होते. पण आता पंजाबला लागोपाठ चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील ५५ वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मोहालीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रेयस अय्य आणि प्रियांश आर्यच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाब किंग्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर आणि कर्णधार अक्षर पटेलच्या दमदार खेळीच्या बळावर दिल्लीने हा सामना खिशात घातला आहे. हा सामना दिल्लीने ३ गडी राखून आपल्या नावावर केला. या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
मोहालीच्या मैदानाव दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबला जशी सुरुवात होती, तशी सुरुवात प्रियांश आर्यने करुन दिली. त्याने अवघ्या ३३ चेंडूंचा सामना करत ५६ धावा केल्या. तर प्रभसिमरन सिंगने १८ धावांचे योगदान दिले.त्यानंतर कुपर कॉनोलीने ३८ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोईनिस १, शशांक सिंग शून्यावर माघारी परतला. शेवटी शशांक सिंग २१ धावांवर नाबाद राहिला. तर कर्णधार श्रेयस अय्यर ५९ धावांवर नाबाद राहिला. या खेळीच्या बळावर पंजाब किंग्सने ५ गडी बाद २१० धावांपर्यंत मजल मारली.
दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २११ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. केएल राहुल ९ तर अभिषेक पॉरेल अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. तर साहील परेखने १३ धावा करून पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने दिल्लीचा डाव सांभाळला.
त्याने ३० चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी करून दिल्लीला विजयाच्या जवळ पोहोचवलं. त्यानंतर डेव्हिड मिलरने दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्याने ५१ धावांची खेळी केली. शेवटी आशुतोष शर्माने २४, माधव तिवारीने नाबाद १८ आणि आकिब नबीने नाबाद १० धावांची खेळी करून पंजाबला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
