आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र या हंगामाला सुरुवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या महत्वाच्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली आहे. ख्रिस वोक्सने आयपीएलच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी वोक्सने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. दिल्ली कॅपिटल्स संघाने वोक्सवर १.५ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं होतं. नोव्हेंबर २०१५ नंतर वोक्स इंग्लंडकडून एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाहीये. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी वोक्सने आयपीएल ऐवजी स्थानिक क्रिकेट स्पर्धेला महत्व दिलेलं आहे. ESPNCricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

वोक्सची आयपीएलमधली कारकिर्द ही संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. २०१७ साली वोक्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना १७ बळी घेतले. २०१८ साली वोक्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळला ज्यात त्याला फक्त ५ सामन्यांत खेळायची संधी मिळाली, ज्यामध्ये तो अपयशी ठरला. वोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य असला तरीही मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला स्थान टिकवता आलेलं नाहीये.