दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यापूर्वी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एक मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रादरम्यान एक गोलंदाज जखमी झाला. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. तो दिल्लीचा नेट गोलंदाज होता आणि फलंदाजाने फटका खेळल्यानंतर चेंडू त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. चेंडू गोलंदाजाला लागताच सर्वच जण घाबरले आणि तात्काळ मैदानावर रुग्णवाहिका बोलावण्यात आली. खेळाडूच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा हा खेळाडू रक्ताने माखलेला दिसला. त्याला रुग्णवाहिकेतून नेत असताना पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी त्याची भेट घेतली. सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन त्यांनी त्याला दिलं. दिल्लीचा हा खेळाडू वेदनेने व्याकूळ झालेला पाहायला मिळाला. या खेळाडूची ओळख अज्ञात आहे, परंतु सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमने-सामने येतील. हा सामना दिल्लीसाठी सोपा नसणार आहे, कारण पंजाब संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाबने सहापैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे, यासह संघाने गट टप्प्यातील अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे पंजाबचा संघ ११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत.
दुसरीकडे, दिल्लीने सहापैकी तीन सामने जिंकले असून तीन गमावले आहेत. दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. मागील सामन्यातील दिल्लीच्या फलंदाजीतील अपयशामुळे चिंता वाढली आहे, मात्र सहकारी खेळाडू ट्रिस्टन स्टब्सने याचे एक समर्पक स्पष्टीकरण दिलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने आपल्या संघाच्या फलंदाजीबद्दलच्या चिंतेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या मोसमात प्रत्येक सामन्यात संघ लक्ष्याचा पाठलाग करत असल्यामुळे त्यांची कामगिरी खराब दिसत आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्टब्स म्हणाला, प्रत्येक सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असल्यामुळे आमची कामगिरी सुमार वाटते. मागच्या सामन्यात, आम्ही एकाच षटकात तीन विकेट गमावल्या आणि आमची फलंदाजीही फारशी चांगली नव्हती. तरीही, आम्ही १९० पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झालो.
