Delhi Capitals Players Fight With Umpires: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १८ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चेन्नईने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. २१३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रिस्टन स्टब्सने एकाकी झुंज दिली. पण तो ६० धावांवर बाद होऊन माघारी परतला. यादरम्यान १९ व्या षटकात ग्लोव्हजची अदलाबदली करण्यावरून चांगलाच वाद पेटला. ज्यावरून ट्रिस्टन स्टब्स नाराज दिसून आला. स्टब्स बाद होऊन माघारी पटल्यानंतर करुण नायर आणि नितीश राणा यांनी अंपायर्ससोबत वाद घातला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, २१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला दिल्लीचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. त्यावेळी दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूत ३२ धावा करायच्या होत्या. ट्रिस्टन स्टब्स आणि कुलदीप यादवची जोडी मैदानावर होती. पहिल्या चेंडूवर लेग बाय स्वरूपात एक धाव मिळाली. त्यानंतर पुढचा चेंडू वाईड होता. पुढील चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स ३८ चेंडूत ६० धावांची खेळी करून माघारी परतला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले.

ग्लोव्हजवरून पेटला वाद

ट्रिस्टन स्टब्स चांगल्याच फॉर्ममध्ये होता. याचा फायदा घेत त्याने दिल्लीला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. ज्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स बाद झाला. त्या चेंडूच्या आदल्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला आपले ग्लोव्हज बदलायचे होते. ओम चौथ्या अंपायरने ग्लोव्हज बदलू दिले नाही. त्यामुळे बाद होऊन माघारी जात असताना तो संताप व्यक्त करताना दिसून आला. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर त्याने रागात हेल्मेट फेकलं. त्यामुळे नितीश राणा आणि करुण नायर अंपायरसोबत वाद घालताना दिसून आले. ट्रिस्टन स्टब्सला नवे ग्लोव्हज हवे होते. पण अंपायरने ग्लोव्हज बदलू देण्याची अनुमती दिली नाही. त्यावेळी दिल्ली संघाचे डायरेक्टर वेणुगोपाल राव देखील संताप व्यक्त करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चेन्नईने उघडलं विजयाचं खातं

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांअखेर २१२ धावा केल्या. चेन्नईकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ११५ धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने ५९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर पथूम निसांकाने ४१ धावांची खेळी केली. पण दिल्लीचा डाव १८९ धावांवर आटोपला. चेन्नईने हा सामना २३ धावांनी आपल्या नावावर केला.