Delhi Capitals Lowest Ever Total In IPL:आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत तरी फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने याआधी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २६४ धावांचा डोंगर उभारला होता. ही या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या होती. तरीदेखील दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्सच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. सुरुवात चांगली मिळाली की शेवट चांगला होतो. पण दिल्लीला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना दिल्लीचे अवघ्या १३ धावांवर ६ फलंदाज तंबूत परतले होते. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्स एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज आहेत. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या धारदार गोलंदाजीसमोर सर्व फलंदाजांनी नांग्या टाकल्या. यासह १३ धावसंख्येवर ६ फलंदाज बाद होऊन माघारी परतले. तर याआधी पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा रेकॉर्ड हा राजस्थान रॉयल्स संघाच्या नावे होते. या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी बाद अवघ्या १४ धावा केल्या होत्या.

आयपीएल स्पर्धेतील पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करणारे संघ

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ६ गडी बाद १३

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २ गडी बाद १४

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – ३ गडी बाद १४

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. दिल्लीकडून अभिषेक पॉरेलने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ८१ चेंडूं शिल्लक ठेवून सामना आपल्या नावावर केला.