Deeya Yadav: आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत कुठल्याही खेळाडूने पदार्पण करण्याची ही पहिलीच वेळ होती. वैभवने दुसऱ्याच सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. आता महिला प्रीमियर लीग स्पर्धेतही इतिहास घडला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून दिया यादवला WPL मध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. यासह ती या स्पर्धेत पदार्पण करणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.

वडोदऱ्यात सुरू असलेल्या या सामन्यात दिया यादवला पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे. दिल्लीने आपल्या प्लेईंग ११ मध्ये मोठा बदल केला आहे. मिन्नू मणीला विश्रांती देण्यात आली असून दिया यादवला संधात स्थान देण्यात आलं आहे. दिया यादव ही महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण करणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. याबाबतीत तिने मुंबई इंडियन्सची स्टार फलंदाज जी कमलिनीला मागे टाकलं आहे. दिया यादवने वय १६ वर्ष १०३ दिवस इतकं असताना महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण केलं आहे. तर जी कमलिनीने वय १६ वर्ष २१३ दिवस असताना महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण केलं होतं.

दिया यादवला महिलांच्या क्रिकेटमध्ये छोटी शफाली म्हणून ओळखलं जातं. शफालीची फलंदाजी शैली ही वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक आहे. तर दिया यादवची फलंदाजी शैली ही शफाली वर्मासारखीच आक्रमक आहे. ती दिल्लीसाठी पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. येत्या काही सामन्यांमध्ये तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारे सर्वात युवा खेळाडू

दिया यादव (दिल्ली कॅपिटल्स)- १६ वर्ष, १०३ दिवस
जी कमलिनी (मुंबई इंडियन्स)- १६ वर्ष, २१३ दिवस
शबनम शकील (गुजरात जायंट्स)- १६ वर्ष, २६३ दिवस
पार्शवी चोपडा (मुंबई इंडियन्स)- १६ वर्ष,३१२ दिवस
एलिस कॅप्सी (दिल्ली कॅपिटल्स)- १८ वर्ष २०५ दिवस

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

मुंबई इंडियन्स (MI): हेली मॅथ्यूज, सजीवन सजना, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), राहिला फिरदौस (यष्टीरक्षक), निकोला कॅरी, अमनजोत कौर, पूनम खेमनार, संस्कृती गुप्ता, शबनिम इस्माइल, वैष्णवी शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स (DC): शेफाली वर्मा, लिझेल ली (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, दीया यादव, निकी प्रसाद, स्नेह राणा, लुसी हॅमिल्टन, श्री चराणी, नंदनी शर्मा.