आयपीएलचे सगळे हंगाम खेळूनही एकही जेतेपद नावावर नसलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आगामी दोन वर्षांसाठी संघात घाऊक बदल करायचं ठरवलं आहे. याचाच भाग म्हणून ऋषभ पंतला त्यांनी ट्रेडऑफमध्ये ताफ्यात घेतलं. कोचिंग स्टाफची पुनर्रचना करून वलयांकित खेळाडूंकडे मार्गदर्शनाचं काम सोपवलं आहे.
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. २०११ वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा युवराज सिंग सहाय्यक प्रशिक्षक असणार आहे. या दोघांच्या बरोबरीने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंडा वास गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. आयपीएल स्पर्धेत तीन हॅट्टिक नावावर असणारा अमित मिश्राही कोचिंग स्टाफचा भाग असणार आहे. क्रिकइन्फोने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ३५५ तर वनडेत ४०० विकेट्स नावावर असणाऱ्या वासने तीन हंगामात डेक्कन चार्जर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. वास यांनी श्रीलंका प्रीमिअर लीगमधील संघाला मार्गदर्शन केलं आहे. न्यूझीलंड संघाबरोबर मेन्टॉर म्हणून काही मालिकांसाठी काम केलं आहे. टी२०वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान आयर्लंड संघाच्या कोचिंग स्टाफचा ते भाग होते.
मिश्राने कॅपिटल्स, लखनौ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. २००८ ते २०२४ या कालावधीत एका वर्षाचा अपवाद सोडला तर मिश्रा सातत्याने आयपीएल खेळला आहे. त्याचं फिरकीचं डोकं भल्याभल्या फलंदाजांना उलगडलेलं नाही. आयपीएल स्पर्धेत त्याच्या नावावर १७४ विकेट्स आहेत. प्रशिक्षक म्हणून काम करण्याची मिश्राची पहिलीच वेळ आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाची मालकी जीएमआर स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जिंदाल साऊथ वेस्ट स्पोर्ट्स यांच्याकडे आहे. दोन वर्ष आलटून पालटून ते संघाचं व्यवस्थापन बघतात. जीएमआरकडे संघाची धुरा असताना वेणूगोपाळ राव डिरेक्टर ऑफ क्रिकेट होते तर हेमांग बदानी मुख्य प्रशिक्षक होते. मुनाफ पटेल गोलंदाजी प्रशिक्षक होता.
