Delhi Capitals vs Gujarat Titans: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १४ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने अवघ्या एका धावेने विजय मिळवला आहे. २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या २ चेंडूंपर्यंत सामना जवळजवळ खिशात घातला होता. पण शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर डेव्हिड मिलरने केलेली एक चूक दिल्ली कॅपिटल्सला चांगलीच महागात पडली आणि हा सामना एका धावेने गमवावा लागला. नेमकं काय घडलं?

दिल्ली कॅपिटल्स संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर फुल फॉर्ममध्ये होता. १९ व्या षटकात फलंदाजी करताना त्याने मोहम्मद सिराजच्या षटकात २३ धावा कुटल्या होत्या. त्यामुळे सामना आपल्या बाजूने खेचून आणला. गुजरातकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी प्रसिध कृष्णा गोलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर विपराज निगमने चौकार मारला. इथून पुढे ५ चेंडूत ९ धावा करायच्या होत्या.

दुसऱ्याच चेंडूवर विपराज निगम मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव स्ट्राइकवर आला. कुलदीप यादवने एक धाव काढून डेव्हिड मिलरला स्ट्राइक दिली. षटकातील चौथ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने १०६ मीटरचा लांब आणि खणखणीत षटकार खेचला. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी २ चेंडूत २ धावांची गरज होती. त्यामुळे सामना दिल्लीच्या खिशात होता.

डेव्हिड मिलरची ही चूक महागात पडली

पाचवा चेंडू त्याने शॉर्ट टाकला. या चेंडूवर डेव्हिड मिलर १ धाव घेऊ शकला असता. पण त्याने धाव घेण्यास नकार दिला. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. जर त्याने १ धाव घेतली असती तर पुढचा चेंडू निर्धाव राहूनही सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. शेवटच्या एका चेंडूवर दिल्लीला विजयासाठी २ धावांची गरज होती. प्रसिध कृष्णाने स्लोव्हर बाऊन्सर टाकला. मिलरने बॅट फिरवली पण चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला आणि त्याने कुलदीप यादवला धावबाद केलं.

डेव्हिड मिलरने वाईड आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी डीआरएसची मागणी केली. पण डीआरएसमध्ये वाईड नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे गुजरात टायटन्सने हा सामना एका धावेने आपल्या नावावर केला. डेव्हिड मिलर ४१ धावांवर नाबाद राहिला. पण त्याने जर पाचव्या चेंडूवर १ धाव घेतली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.