टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ट्रोलर्सनी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर निशाणा साधला. त्याचबरोबर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबालाही धमक्या मिळाल्या आहेत. विराटच्या १० महिन्यांच्या मुलीलाही ट्विटरवरील एका अज्ञात अकाऊंटवरून धमक्या आल्या आहेत. हे ट्वीट कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या हे अकाउंट डिलीट करण्यात आले आहे. विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबासाठी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर सोशल मीडियावर लोक विराटच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाने (DWC) दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. विराट कोहलीनेही शमीला पूर्णपणे पाठिंबा दिला. लक्ष्य करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत दिले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा-वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले.

सोशल मीडियावर या विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत व्यक्त झाले. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते, हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळाले. असंवेदनशील टिप्पण्या आणि शिवीगाळ याचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर काहींनी या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले आहे.

हेही वाचा – “पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत मी खेळपट्टीवर पुन्हा परतलो असेन”, युवराज सिंगनं दिले सूतोवाच!

भारतीय नियामक क्रिकेट मंडळ (बीसीसीआ) आजी-माजी खेळाडू मोहम्मद शमीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यानंतर विराटही मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. “आमचे लक्ष्य बाहेरच्या ड्रामेबाजीवर नाही. आम्ही पूर्णपणे सामन्यावर लक्ष्य केंद्रित करत आहोत. कुणावरही धर्माच्या आधारावर निशाणा साधणे चुकीचे आहे. काही जण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्य करतात. आता हे सर्व रोजचेच झाले आहे.”

विराट पुढे म्हणाला, ”हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून अशा पद्धतीने त्रास दिला जातो. आम्ही आमच्या ड्रेसिंग रुममधले वातावरण खेळमेळीचे ठेवतो. बाहेर जो काही ड्रामा सुरु आहे, तो पूर्णपणे त्यांच्या चुका दाखवत आहे. मी कधीच कुणासोबत असा भेदभाव केला नाही. काही लोकांचे फक्त हेच काम असते. जर कुणाला मोहम्मद शमीचे खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही”, असे विराटने म्हटले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi commission for women steps in after virat kohlis daughter online threatened adn
First published on: 02-11-2021 at 16:04 IST