क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे म्हणतात, मग ते सहा चेंडूत सहा षटकार असो, किंवा एका षटकात चार बळी असो. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा ठोकत सर्वांना स्तब्ध केले होते. आता असाच काहीसा पराक्रम दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने केला आहे. सुबोधने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकत सर्वांचा लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुबोधने २०५ धावांची नाबाद खेळी केली.

एका क्लब टी-२० सामन्यात खेळत सुबोधने द्विशतक ठोकले. त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने १०२ धावा १७ चेंडूत केल्या. म्हणजे त्याने १७ षटकार ठोकले. याशिवाय त्याने आपल्या खेळीत १७ चौकार लगावले. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला.
रणजी क्रिकेटर सुबोधच्या संघाने एकूण २५६ धावा केल्या. त्याने २५०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या. यापूर्वी सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकले आहेत.

 

हेही वाचा – ‘‘धोनीसाठी कोणताही खेळाडू बंदुकीची गोळी खाण्यास तयार”

आयपीएलमध्ये ख्रिस गेल, आंद्रे रसेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे स्टार क्रिकेटपटू गोलंदाजांवर बरसतात. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये ६ शतके आहेत, तर विराट कोहलीने लीगमध्ये ५ शतके ठोकली आहेत.