आज राजस्थान रॉयल्सशी गाठ

अबू धाबी : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्यात दुपारी रंगणाऱ्या पहिल्याच सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्स संघाशी गाठ पडणार आहे. दोन्ही संघांनी दुसऱ्या टप्प्याची विजय सुरुवात केली असून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या युवा कर्णधारांपैकी कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार दिल्लीने यंदा दिमाखात सुरुवात करताना पूर्वार्धात आठपैकी सहा सामने जिंकले होते. त्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या सामन्यातही सनरायजर्स हैदराबादला आठ गडी राखून धूळ चारली. दुसरीकडे, राजस्थानने पहिल्या लढतीत पंजाब किंग्सवर निसटता विजय मिळवला. आठ सामन्यांत राजस्थानचा हा चौथा विजय ठरला.

दिल्ली कॅपिटल्स

हैदराबादविरुद्धच्या विजयात अनुभवी सलामीवीर शिखर धवनसह (४२), पंत (नाबाद ३५) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ४७) या आजी-माजी कर्णधारांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीत दिल्लीची कागिसो रबाडा, आनरिख नॉर्किए आणि अश्विनवर मदार आहे.

राजस्थान रॉयल्स

पंजाबविरुद्ध सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४९) आणि महिपाल लोमरोर (४३) या युवकांच्या खेळी महत्त्वाच्या ठरल्या. कर्णधार सॅमसनने अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. गोलंदाजांमध्ये कार्तिक त्यागी आणि मुस्ताफिझुर रहमान यांच्याकडून पुन्हा टिच्चून माऱ्याची अपेक्षा आहे.

’  सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा. पासून

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

कोलकाता संघाला दंड

अबू धाबी : मुंबई इंडियन्सव्निरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात षटकांची गती न राखल्याने कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात खेळलेल्या इतर खेळाडूंना ६ लाख किंवा सामन्याच्या मानधनातील २५ टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल तितका दंड आकारण्यात येईल. यंदा ‘आयपीएल’ सामन्यात षटकांची गती न राखण्याची ही कोलकाताची दुसरी वेळ आहे.