डेन्मार्क-फिनलंड सामना स्थगितीनंतर पुन्हा सुरू; ‘युरो’चाहत्यांकडून कौतुक

डेन्मार्कचा सर्वोत्तम आक्रमणपटू ख्रिस्तियन एरिक्सन  सामन्यादरम्यान मैदानावर कोसळल्यामुळे शनिवारच्या डेन्मार्क-फिनलंड यांच्यातील युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भीती आणि थराराचे वातावरण निर्माण झाले.   हा सामना स्थगित करण्यात आला होता. मात्र एरिक्सनची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर दीड तासानी सामना पुन्हा सुरू झाला आणि ‘युरो’चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

एरिक्सन मैदानावर कोसळल्यावर जवळपास १० मिनिटे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र या घटनेचा धक्का जगभरातून हा सामना पाहणाऱ्या युरोचाहत्यांना बसला. समाजमाध्यमांवर या घटनेची चित्रफीत तातडीने पसरली आणि क्रीडाप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली.  उभय संघांतील लढतीची ४० मिनिटे झाली असतानाच एरिक्सनने सहकाऱ्याला चेंडू सोपवला आणि क्षणार्धातच तो थेट खाली कोसळला. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंनी त्वरित त्याच्या दिशेने धाव घेतली. एरिक्सनच्या पत्नीनेदेखील मैदान गाठले. त्याला श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचे समजते.

खेळ थांबल्यामुळे चाहत्यांमध्येही अनेकांना रडू कोसळले. काही मिनिटांच्या अवधीतच एरिक्सनची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ‘ट्वीट’ युरोपियन फुटबॉल महासंघाने केले. दरम्यान, दोन्ही संघ आणि सामनाधिकाऱ्यांची आपत्कालिन बैठक बोलावण्यात आली. त्यात  सामना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जगभरातील क्रीडा चाहत्यांकडून डेन्मार्क संघाचे कौतुक करण्यात आले.

कटू इतिहास… इंग्लंडचा फुटबॉलपटू फॅब्रिस मॉम्बाला याला २०१२मध्ये सामन्यादरम्यानच ह्दयविकाराचा झटका आला होता.  कॅमेरूनचा खेळाडू मार्क फोए याचे २००३ साली मैदानातच निधन झाले होते. हंगेरीच्या मिक्लोस फेहेर याचा २००४मध्ये सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता. टर्कीच्या गोकमन यिलदिरन याचा २००६मध्ये खेळतानाच मृत्यू झाला होता.