डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं सायना नेहवालचं स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं. अंतिम फेरीत तैवानच्या ताई त्झु यिंगने सायनावर 21-13, 13-21, 21-6 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यिंगपुढे सायना नेहवालचा निभाव लागलाच नाही.

आतापर्यंत ताई त्झु यिंग आणि सायना नेहवाल यांच्या लढतीत यिंगने नेहमी बाजी मारली आहे. नुकत्याच जकार्ता येथील आशियाई खेळांमध्येही यिंगने सायनाला पराभूत केलं होतं. 2013 साली झालेल्या स्विस ओपन स्पर्धेत सायनाने यिंगला पराभवाचं पाणी पाजलं होतं. यानंतर सायना नेहवाल यिंगविरोधात एकही सामना जिंकू शकलेली नाहीये. पहिल्या सेटमध्ये यिंगच्या आक्रमक फटक्यांपुढे सायनाचा निभाव लागला नाही. 21-13 च्या फरकाने सेट जिंकत ताई त्झु यिंगने सामन्यात आघाडीही घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र सायनाने अनपेक्षितरित्या पुनरागमन करत यिंगला धक्का दिला. पहिल्या मिनीटापासून आघाडी घेत सायनाने दुसऱ्या सेटवर आपलं वर्चस्व गाजवलं. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅली रंगल्या. दुसरा सेट जिंकायला सायनाला अवघ्या 2 गुणांची आवश्यकता असताना यिंगने काही चांगले फटके खेळत सायनाचा विजय लांबवला, मात्र सायनाने शांतपणे खेळ करत 13-21 च्या फरकाने सेट जिंकत पुनरागमन केलं.

तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा सायनाचा खेळ खालावला. ताई त्झु यिंगने चतुर खेळ करत बॅडमिंटन कोर्टच्या दोन्ही बाजूंना आक्रमक फटक्यांची बरसात केली, ज्यांचा प्रतिकार करणं सायनाला जमलं नाही. स्मॅश, ड्रॉप सारख्या उत्कृष्ट फटक्यांचा वापर करत ताई त्झु यिंगने तिसऱ्या सेटच्या मध्यांतराना 11-2 अशी भलीमोठी आघाडी घेतली होती. यानंतर सायना सामन्यात पुनरागमन करुच शकली नाही. अखेर यिंगने 21-6 च्या फरकाने सामना जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केलं.