भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोर्टवर परतणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूसह सायना नेहवालच्या कामगिरीवरही चाहत्यांची नजर असेल. ऑगस्ट महिन्यात झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधूने काही काळ विश्रांती घेतली. आता डेन्मार्क स्पर्धेत पुनरागमन करताना पहिल्या फेरीत चौथ्या मानांकित सिंधूपुढे तुर्कीच्या नेस्लीहान यिगीतचे आव्हान असेल. या स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आल्यास तिला दुसऱ्या फेरीत थायलंडची आघाडीची खेळाडू बुसानन ओंगबमरुंगपानचा सामना करावा लागू शकतो. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायनाचा सामना जपानच्या अया ओहोरीशी होईल. त्याचप्रमाणे चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या सातव्या मानांकित जोडीवरही भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल. पुरुष दुहेरीतील पहिल्या फेरीत त्यांच्यापुढे इंग्लंडच्या कॅलम हेमिंग आणि स्टीव्हन स्टॉलवूड जोडीचे आव्हान असेल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ’ वेळ : दुपारी १२.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स ३