एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानली जाणारी भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑलिम्पिकमधील सुमार कामगिरी आणि गैरवर्तनप्रकरणी लादण्यात आलेल्या निलंबनामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या विनेशने भारतीय क्रीडा क्षेत्रातील काळ्या बाजूवर टीका करतानाच पुन्हा मॅटवर न परतण्याची भावना व्यक्त केली आहे.

हरयाणाच्या २६ वर्षीय विनेशला ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५३ किलो वजनी गटात अग्रमानांकन देण्यात आले होते. विनेशने स्पर्धेची दमदार सुरुवात करताना बाद फेरीची लढत जिंकली; परंतु उपांत्यपूर्व सामन्यात तिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विनेशसह भारतातील सर्व क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला. काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकदरम्यान विनेशने अन्य भारतीय कुस्तीपटूंसह राहण्यास आणि सराव करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली. त्याशिवाय अधिकृत प्रायोजकांचे नाव असलेली जर्सी न घालताच लढत खेळण्यासाठी मॅटवर उतरल्याने भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) विनेशला तात्पुरते निलंबित केले. अखेर शुक्रवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विनेशने तिची व्यथा मांडली.

‘‘गेला संपूर्ण आठवडा माझी कसोटी पाहणारा ठरला. टोक्यो ऑलिम्पिकमधील पदक हुकल्यामुळे मी फार मोठा गुन्हा केल्यासारखे भासत आहे. मी कोणत्या परिस्थितीतून इथवर मजल मारली, हे ज्यांना माहीत नाही, तेसुद्धा माझ्यावर टीका करत आहेत. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा किंवा दडपणामुळे मी हरले नाही. त्यामुळे क्रीडापटूविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी त्याचे काय म्हणणे आहे किंवा तो कोणत्या अवस्थेत आहे, हे जाणून घ्या,’’ असे विनेश म्हणाली.

‘‘मी हळवी आहे. २०१७मध्ये डोक्याला दुखापत झाल्यापासून मी मानसिक आरोग्याची काळजी घेते. ऑलिम्पिकमध्ये माझ्या डाव्या पायाची दुखापत पुन्हा बळावल्याने पदकाची संधी निसटली. सामन्याच्या दिवशी मी खेळण्याच्या स्थितीत नव्हते. लढतीच्या एक दिवस आधीपासून फारसे काही खाण्याची इच्छा न झाल्यामुळे माझी तब्येत बिघडत गेली; परंतु पराभवानंतर सर्वानी मी कुठे चुकले हेच सांगितले. कोणीही मी का चुकले किंवा मी कोणत्या स्थितीतून जात आहे, हे विचारलेच नाही,’’ असेही राष्ट्रकुल आणि आशियाई सुवर्णपदकविजेत्या विनेशने सांगितले. घरी परतल्यावर मी फक्त काही तासांसाठीच झोपली असून ऑलिम्पिकनगरीत राहतानाही मी तासन्तास एकाच गोष्टीवर विचार करत बसायची, असेही तिने नमूद केले.

विनेशच्या उत्तराची महासंघाला प्रतीक्षा

युवा कुस्तीपटू सोनम मलिकने महासंघाच्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिले असून गैरवर्तनप्रकरणी माफी मागितली आहे; परंतु विनेशने अद्याप महासंघाकडे तिच्या वागणुकीबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे तिच्यावरील निलंबन कायम आहे. ‘‘सोनमने महासंघाची माफी मागितली असून अशी चूक पुन्हा न करण्याचे आश्वासन दिले आहे. विनेशने तिची मानसिक व्यथा मांडली असली, तरी महासंघाचा त्याच्याशी संबंध नसून तिने १६ ऑगस्टपर्यंत कारणे दाखवा नोटीसला अधिकृतपणे उत्तर देणे गरजेचे आहे,’’ असे महासंघाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

मदतीसाठी नेमबाजीचे फिजिओ

ऑलिम्पिकदरम्यान एकटय़ाने राहणाऱ्या विनेशला नेमबाजी चमूतील फिजिओंची मदत घेण्यास सांगण्यात आले; परंतु त्याचा मला कोणताच फायदा झाला नाही, असे विनेशने सांगितले. नेमबाजीच्या फिजिओंना माझ्या शरीरयष्टीनुसार उपचार करता आले नाहीत. त्यामुळे मीच माझ्या पद्धतीने स्वत:ला सावरत होते, असे विनेश म्हणाली.

अमेरिकेची जिम्नॅस्टिक्सपटू सिमोन बाइल्सने मानसिक समस्येमुळे ऑलिम्पिकमधील काही प्रकारांत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला; परंतु अशीच व्यथा जेव्हा एखादा भारतीय खेळाडू मांडतो, तेव्हा त्याच्या मताकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. टोक्योमध्ये मी पूर्णपणे एकटी होती. त्यामुळे आतासुद्धा मला काही काळ एकटेच राहायचे असून सद्य:स्थिती पाहता मॅटकडे न परतणेच अधिक सोयीचे वाटत आहे.

– विनेश फोगट