जम्मू व काश्मीर संघाने रणजीमधील ‘दादा’ मानल्या जाणाऱ्या मुंबई संघावर सनसनाटी विजय मिळविला आणि केवळ क्रिकेट नव्हे तर तमाम क्रीडाक्षेत्रात खळबळ उडवून दिली. स्थानिक स्पर्धामध्ये असे अनपेक्षित निकाल नोंदवले जातात, ही वस्तुस्थिती असली तरी जम्मू संघाचा हा विजय देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या असंख्य नैपुण्यवान खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचाच आहे.

आपल्या देशात किती तरी खेळाडू असे आहेत की, त्यांच्या कामगिरीचा फारसा गांभीर्याने विचार केला जात k08नाही. जम्मू-काश्मीर संघाचा परवेझ रसूल हा नेहमी भारतीय संघाच्या उंबरठय़ावरील खेळाडू मानला जातो. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, मात्र काही वेळा खेळाडूचे राज्य कोणते आहे, त्याचा ‘गॉडफादर’ कोण आहे यावरूनही निवडीबाबत विचार केला जातो. भारतीय क्रिकेट संघाचा ताईत बनलेला महेंद्रसिंह धोनी हा झारखंडसारख्या क्रिकेटसाठी उपेक्षित भागातूनच तयार झालेला खेळाडू आहे. त्याने स्वत:च्या कौशल्यावर भारतीय संघात स्थान मिळविले व टिकविले.

केवळ क्रिकेट नव्हे तर अन्य अनेक क्रीडा प्रकारांत आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल कामगिरी करण्याची क्षमता असलेले खेळाडू आपल्या देशात आहेत. मात्र त्यांना अपेक्षेइतकी संधी मिळत नाही. त्यांच्यामागे कोणी भक्कम आधार देणारा नसतो. त्यांना फारसे आर्थिक पाठबळ मिळत नाही आणि समजा आर्थिक पाठबळ k07मिळालेच तर संघात स्थान मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘वजनात’ ते कमी पडतात. पूर्वाचल राज्यांमध्ये क्रीडा नैपुण्य नाही असा गैरसमज आहे व जाणीवपूर्वक तो पसरविला जातो. भारताला महिलांच्या बॉक्सिंगमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी एम. सी. मेरी कोम ही याच भागातून तयार झालेली खेळाडू आहे. तिने पाच वेळा जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. बॉक्सिंग हा महिलांनी खेळावयाचा खेळ नाही, असे आपल्या देशात मानले जात होते, मात्र ‘सुपरमॉम’ असूनही आपण या खेळात ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचू शकतो, हे तिने दाखवून दिले आहे.

हरयाणातील बळाली या गावात महिलांनी जास्त शिकू नये व उपवर झाली की तिचा विवाह करण्याची प्रथा होती. बबिता, गीता व विनेश या फोगट भगिनींनी या प्रथेला व गावातील विरोधाला न जुमानता कुस्तीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील महावीर हे स्वत: कुस्तीगीर, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याचे त्यांचे स्वप्न घरच्या अडचणींमुळे अपुरे राहिले. आपले हे स्वप्न मुलींनी पूर्ण करावे, यासाठी त्यांनी घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत आपल्या मुलींना कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले आणि या मुलीच देशाला अनेक पदके मिळवून देत आहेत.

अ‍ॅथलेटिक्समध्ये कविता राऊत या आदिवासी खेळाडूने राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करीत आदिवासी भागातही धावपटू घडू शकतात हे दाखवून दिले आहे. तिच्याप्रमाणेच अनेक खेळाडू विविध ग्रामीण भागांतून पुढे येत अ‍ॅथलेटिक्सची कारकीर्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
फुटबॉल, हॉकी यांसारख्या सांघिक खेळांच्या लीगमध्ये जम्मू, झारखंड, मणीपूर, आसाम आदी राज्यांमधील अनेक गुणवान खेळाडूंना संधी मिळाली आहे. या लीगमध्ये ते चमकही दाखवितात, मात्र अशा नैपुण्यवान खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळत नाही. समजा मिळाले तर त्यांना अपेक्षेइतकी संधी मिळत नाही. गोल्फसारख्या खेळातही शेतकरी कुटुंबात जन्म झालेले तीन-चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू लागले आहेत.

खेळाचा प्रसार व प्रचार तळागाळात होण्याची आवश्यकता आहे, अशी नेहमीच घोषणाबाजी केली जाते, मात्र वस्तुत: अपेक्षेइतका प्रसार होत नाही. खेडोपाडी खेळाचा प्रसार करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. प्रत्येक खेळाच्या संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशात अनेक ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीद्वारे ग्रामीण व उपेक्षित भागातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात असते. या प्रबोधिनींमध्ये अनेक गुणवान खेळाडू असतात याची जाणीव संबंधित खेळांच्या संघटकांनी ठेवली पाहिजे. प्रबोधिनीतील खेळाडू म्हणजे दुय्यम दर्जाचे खेळाडू असतात, ही भावना सपशेल चुकीची आहे. त्यांच्याकडे जागतिक स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने क्रीडा विकास होईल.