ऑस्ट्रेलियाच्या दमदार आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची स्थिती बिकट झाली आहे. केव्हिन पीटरसनने जबाबदारीपूर्ण शतक व कर्णधार अ‍ॅलिस्टक कुक व इयान बेल यांनी अर्धशतक झळकावली. पण अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ७ बाद २९४ अशी अवस्था असून, ते अजूनही २३३ धावांनी पिछाडीवर आहेत.
सकाळच्या आठव्याच षटकात इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट (५) लवकर बाद झाला. मग कुकने पीटरसनसोबत डाव सावरला. कुकने  ७ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी साकारली. कुक बाद झाल्यावर पीटरसनने बेलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. बेलने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. बेल बाद झाला तरी पीटरसनने एक बाजू सावरून धरत कारकीर्दीतील २३वे शतक झळकावले. पीटरसनने १२ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ११३ धावांची खेळी साकारली, पण तो बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव पुन्हा संकटात सापडला.