India vs Srilanka 1st Test, Devdutt Padikkal Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६७ धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो ४४ धावा करुन माघारी परतला. त्याचं अर्धशतक ६ धावांनी हुकलं असलं, तरीदेखील त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
देवदत्त पडिक्कलचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यासाठी साई सुदर्शनची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली होती. पण, साई सुदर्शन पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच डावात दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीसह त्याने अनेक रेकॉर्ड मोडून काढले होते. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याला चांगली सुरुवात मिळाली. पण ४४ धावांवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.
देवदत्त पडिक्कलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद
चेतेश्वर पुजाराने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनेक फलंदाजांना संधी दिली गेली. पण कुठलाही फलंदाज पुजारसारखी थकवणारी फलंदाजी करु शकला नव्हता. पण, देवदत्त पडिक्कलने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं की, तो देखील पुजारासारखी फलंदाजी करु शकतो. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने १६७ आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ४४ धावा केल्या. यासह त्याने दोन्ही डावात मिळून २११ धावा केल्या. यासह तो श्रीलंकेत कसोटी क्रिकेटमधील एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावे सर्वाधिक २५१ धावा करण्याची नोंद आहे. त्याने पहिल्या डावात २०१ आणि दुसऱ्या डावात ५० धावांची खेळी केली होती. तर शिखर धवने तिसऱ्या स्थानी आहे. शिखरने २०४ आणि चौथ्या स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावे २०३ धावा करण्याची नोंद आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकाच कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
वीरेंद्र सेहवाग- २५१ धावा (२०१ आणि ५० धावा)
देवदत्त पडिक्कल – २११ धावा (१६७ आणि ४४ धावा)
शिखर धवन – २०४ धावा (१९० आणि १४ धावा)
सचिन तेंडुलकर – २०३ धावा ( एकाच डावात)
