Devdutt Padikkal Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना श्रीलंकेतील गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना दमदार शतक झळकावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलने १५० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शनची निवड करण्यात आली होती. पण साई सुदर्शन पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पडिक्कलने या संधीचं सोनं केलं आणि पहिल्याच दिवशी आपल्या कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. आता दुसऱ्या दिवशी त्याने खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. पडिक्कल हा श्रीलंकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५० धावांची खेळी करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड चेतेश्वर पुजाराच्या नावावर होता. पुजाराने २०१७ मध्ये झालेल्या गॉल कसोटीत १५३ धावांची खेळी केली होती. आता देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेत तिसऱ्या क्रमांकावर मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने १६७ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ मजबूत स्थितीत
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने मिळून पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. जैस्वाल ३२ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुलने ८२ धावांची खेळी केली. केएल राहुल पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात आला. देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने १६, ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३५० धावांचा पल्ला गाठला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज
देवदत्त पडिक्कलला बराच वेळ वाट पाहिल्यानंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं, या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. त्याने गॉलच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळताना १३६ चेंडूंचा सामना करत १ षटकार आणि ९ चौकारांच्या साहाय्याने विक्रमी शतकी खेळी केली. ९९ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने १ धाव घेतली आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंच शतक पूर्ण केलं. यासह त्याच्या नावे आणखी एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. पडिक्कल हा स्वातंत्र्यदिनी शतक झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
