Devdutt Padikkal Double Hundred in Ranji Trophy Semi Final: एकीकडे भारतात टी-२० विश्वचषक २०२६ दणक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलचे सामने खेळवले जात आहेत. एक सामना बंगाल व जम्मू काश्मीर यांच्यात खेळवला जात आहे. तर दुसरा सामना कर्नाटक व उत्तराखंड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात देवदत्त पड्डिकने द्विशतक झळकावलं आहे.
देवदत्त पडिक्कल सेमीफायनलमध्ये कर्नाटक संघाचं नेतृत्त्व करत आहे. यादरम्यान त्याने पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं द्विशतक पूर्ण केलं. देवदत्तने २९७ चेंडूत २५ चौकार व २ षटकारांसह वादळी द्विशतक झळकावलं आहे. पडिक्कलच्या या वादळी खेळीच्या बळावर कर्नाटकने पहिल्याच डावात मोठी धावसंख्या उभारली आहे.
देवदत्त पडिक्कलचं कारकिर्दीतील पहिलं द्विशतक
लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये कर्नाटक व उत्तराखंड यांच्यातील सामना खेळवला जात आहे. उत्तराखंडने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उत्तराखंडने नवव्या षटकात मयंक अग्रवालला झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. पण यानंतर केएल राहुलने उत्तराखंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. राहुलने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि देवदत्त पडिक्कलच्या खेळीने यात महत्त्वाची भर घातली.
केएल राहुलने सलामीला उतरत २११ चेंडूत ११ चौकार व ५ षटकारांसह १४१ धावांची शानदार खेळी केली. तर देवदत्त पडिक्कल ३३० चेंडूत २९ चौकार व ३ षटकारांसह २३२ धावा करत झेलबाद झाला. तर करूण नायर ६० धावांची खेळी करत बाद झाला. यासह कर्नाटकने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात आतापर्यंत ४८४ धावांचा डोंगर उभारला आहे.
देवदत्त पडिक्कल देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. खोऱ्याने धावा करत त्याने शतकांचा पाऊस पाडला आहे. विजय हजारे ट्रॉफीत पडिक्कलने ४ शतकं झळकावली. त्यानंतर रणजी ट्रॉफीत दोन शतकं केली आहेत. तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याच्या बॅटमधून एक शतक पाहायला मिळालं. देवदत्तच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्नाटकने प्रत्येक सामन्यात चांगली धावसंख्या उभारली आहे.

