Devdutt Padikkal Century Warm Up Match: भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार खेळी साकारत सराव सामन्यात शतक झळकावलं आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका इलेव्हन संघाविरूद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने शतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे.

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. १५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखण्यासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका इलेव्हन संघाविरूद्ध सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्यात श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना सादर केला.

तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शतकी खेळी साकारत भारतासमोरील एक मोठी समस्या सोडवली. या खेळीदरम्यान पडिक्कल उत्कृष्ट लयीत दिसून आला आणि त्याने अनेक शानदार फटके लगावले. पडिक्कलने १२१ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने आपली शतकी खेळी साकारली.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनच्या ३६३ धावांना प्रत्युत्तर देताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली; संघाच्या खात्यात एकही धाव जमा होण्याआधीच यशस्वी जैस्वालच्या रूपाने त्यांनी आपली पहिली विकेट गमावली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने केवळ डाव सावरलाच नाही, तर आक्रमक शतक झळकावून संघ व्यवस्थापनाचा विश्वासही संपादन केला.

देवदत्त पडिक्कलला शतकानंतर रिटायर्ड आऊट का करण्यात आलं?

शतक पूर्ण केल्यानंतर तो सेलिब्रेशन करत मैदानाबाहेर जाताना दिसला. त्याच्यानंतर मैदानावर येताना ऋषभ पंतने त्याला मिठी मारत त्याच्या शतकासाठी कौतुक केलं. या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं. देवदत्त पडिक्कलने शतकी खेळी साकारल्यानंतर त्याला रिटायर्ड आऊट केलं. इतर फलंदाजांना संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने त्याला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला.

भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे सध्या श्रीलंकेला जाऊ शकलेला नाही. त्यामुळे, १५ ऑगस्टला गॉल येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. या सराव सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पडिक्कलने शतक झळकावलं. भारतासाठी खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यात त्याने यापूर्वीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे, जर पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत साई सुदर्शन पूर्णपणे फिट झाला नाही, तर देवदत्त पडिक्कल हा एकयोग्य पर्याय म्हणून समोर आला आहे.