Devdutt Padikkal Maiden test hundred: देवदत्त पडिक्कलने भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुरू असलेल्या गॉल कसोटीत आपल्या कारकिर्दीतील पहिलं कसोटी शतक झळकावलं आहे. भारताचा ६०० वा कसोटी सामना आणि भारताचा स्वातंत्र्यदिन अशा दुग्धशर्करा योग असलेल्या खास दिवशी देवदत्त पडिक्कलने ही खास खेळी साकारली. यासह १९ कसोटी सामन्यांनंतर भारताच्या तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाने हे पहिलं शतक झळकावलं आहे.

देवदत्त पडिक्कलने १३६ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ही विक्रमी खेळी साकारली आहे. देवदत्त पडिक्कने अडीज वर्षांत फक्त तिसरा कसोटी सामना खेळताना शानदार शतक झळकावलं आहे. साई सुदर्शनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलची निवड करण्यात आली आणि त्याने या संधीचं सोनं करत आपलं कौशल्य सर्वांना दाखवलं आहे. ९९ धावांवर खेळत असताना एक धाव घेताच त्याने हे ऐतिहासिक शतक पूर्ण केलं. यासह भारताच्या स्वातंत्र्यदिनी शतक करणारा देवदत्त पडिक्कल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

देवदत्त पडिक्कलने शतक झळकावताच ड्रेसिंग रूममध्येही एक आनंदाची लहर उमटली. भारताचे कोच गौतम गंभीर व निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनीही उभं राहून टाळ्या वाजवत देवदत्तच कौतुक केलं.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. तर यानंतर केएल राहुल व देवदत्त पडिक्कल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी दोन्ही सत्र खेळून काढत टीम इंडियाचा डाव पुढे नेला.

देवदत्त पडिक्कलने येताच थेट षटकार लगावत आपलं खातं उघडलं. यानंतर त्याने काही चेंडूंवर आक्रमक फटके तर प्रसंगी सावधपणे खेळत आपला खेळ साकारला. सराव सामन्यात देवदत्त पडिक्कलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती. त्याचप्रकारे त्याने या कसोटी सामन्यातही आपली खेळी साकारली. सराव सामन्यात पडिक्कलने नाबाद १४२ धावांची खेळी केली होती.