Ind vs Sl, Devdutt Padikkal: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. तर कोलंबोत पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत सोनल दिनुशाने जबरदस्त फलंदाजी केली आणि भारतीय संघाच्या हातचा विजय हिसकावून घेतला. त्यामुळे हा सामना बरोबरीत समाप्त झाला. ही मालिका भारतीय संघाने १-० ने आपल्या नावावर केली. यादरम्यान २ शतकं झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कलची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

देवदत्त पडिक्कलला या मालिकेत बॅकअप खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. पण मालिका सुरू होण्याआधीच साई सुदर्शन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्याने पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावलं. देवदत्त पडिक्कल या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला. तर भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तो अव्वल स्थानी होता.

सामना झाल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

ही मालिका झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ५ फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान त्याने मालिकावीर पुरस्काराच्या ट्रॉफीसोबत असलेला फोटो आणि शतक पूर्ण केल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. पण पाचव्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

भारतीय संघाला जवळजवळ अडीच दिवस क्षेत्ररक्षण करावं लागलं. त्यामुळे टॅनिंगमुळे त्याच्या जर्सीचा नंबर आणि नाव त्याच्या पाठीवर उमटलं आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, “या संधीबद्दल खूप आभारी आहे, आणखी संधी मिळण्याची वाट पाहतोय. मालिका खूप चुरशीची झाली. या मालिकेतून बरंच काही शिकायला मिळालं. आता पुढच्या आव्हानाची वाट पाहतोय. शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा, उन्हाने मला टॅटू दिलाय..”

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५०३ धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २९० धावा केल्या. यासह भारतीय संघाने फॉलोऑन दिला. त्यानंतर भारतीय संघाला पुन्हा फलंदाजीला येण्याची संधी मिळाली नाही. श्रीलंकेने २०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आणि सामना बरोबरीत सुटला.