युवा मल्लखांबपटूंना घडवण्याचे लक्ष्य!

मल्लखांब क्रीडा प्रकारातील पहिली अर्जुन पुरस्कार विजेती ठरल्याचा आनंद निराळाच आहे.

|| हिमानी परब : मल्लखांबपटू

खरे सांगायचे, तर २०१९मध्ये मुंबईत झालेल्या जागतकि अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत चार सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची कमाई केल्यामुळे गतवर्षीच मला अर्जुन पुरस्कार मिळेल, अशी आशा होती; परंतु तसे न झाल्याने मी निराश झाले होते. यंदा मात्र नामांकन यादी पाहून दिलासा मिळाला. अखेर दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी माझी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याचे सांगताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. विलंबाने का होईना, माझ्या कामगिरीची दखल घेण्यात आल्याने मी समाधानी आहे.

मल्लखांब क्रीडा प्रकारातील पहिली अर्जुन पुरस्कार विजेती ठरल्याचा आनंद निराळाच आहे. त्या दिवसापासूनच सातत्याने सर्वांचे फोन येत आहेत. सर्वांचे कौतुकाचे संदेश वाचून माझे आई-वडीलही भारावले आहेत. मात्र शासनाने या पुरस्कारासह माझा गौरव केल्याने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. नुकतेच माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याने आता भविष्यात मल्लखांबावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणारे मल्लखांबपटू मला घडवायचे आहेत.

मोठी बहीण मानसीकडून प्रेरणा घेत वयाच्या पाचव्या वर्षी दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे मी मल्लखांब शिकण्यासाठी नाव नोंदवले. सुरुवातीला फक्त आवड म्हणून मी मल्लखांब करायचे. मात्र नंतर मल्लखांबाच्या प्रत्येक प्रकाराचे मला फायदे कळू लागले. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंतचा व्यायाम मल्लखांबाद्वारे होतो. त्याशिवाय मानसिकदृष्ट्या एकाग्र आणि शांत राहण्यासाठी हा क्रीडा प्रकार अत्यंत फलदायी आहे. या दरम्यान अनेकदा दुखापत झाल्याने पालकांनी एक वेळ मला खेळ सोडण्याबाबत सुचवले होते. याशिवाय मुलगी असल्याने या क्रीडा प्रकारात नेमके किती चमकणार, अशी चिंता त्यांना सतावत राहायची. मात्र मी निर्णयावर ठाम राहिले आणि मल्लखांबामध्येच कारकीर्द घडवण्याचे ठरवले.

माझ्याहूनही असंख्य कौशल्यवान मल्लखांबपटू आपल्या देशात आहेत; परंतु त्यांची प्रगती राज्य अथवा राष्ट्रीय पातळीपर्यंतच मर्यादित राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मल्लखांबाच्या तितक्या स्पर्धाही होत नसल्याने त्यांची वाढ खुंटली. मात्र २०१९ हे वर्ष मल्लखांब क्रीडा प्रकाराला एक प्रकारे नवसंजीवनी देणारे ठरले. श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत जवळपास १५ देशांतील खेळाडू सहभागी झाले. भारताने अपेक्षेप्रमाणे यामध्ये सांघिक जेतेपद मिळवले आणि त्यात मीसुद्धा योगदान दिल्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी प्रथमच मल्लखांबाचा विचार करण्यात आला. त्यामुळे देशपांडे सर, नीता ताटके, अस्मिता नायक, श्रेयस म्हसकर यांनाही माझ्या पुरस्काराचे श्रेय जाते. पालकांसह या सर्वांचे पाठबळ आणि मार्गदर्शनाशिवाय इथवर मजल मारणे मुळीच शक्य झाले नसते.

जे मल्लखांब करण्यास घाबरतात किंवा ज्यांना इच्छा नाही अथवा आळस येतो, अशा सर्वांना मी फक्त एकदाच मल्लखांबाची प्रात्यक्षिके करण्याचे सुचवेन. मला खात्री आहे, की मग तुम्ही स्वत:हूनच मल्लखांबाकडे आकर्षित व्हाल. याशिवाय जे आता मल्लखांब करत आहेत, त्यांनी जिद्द सोडू नका. इतकी वर्षे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, हे सर्वोच्च लक्ष्य आपल्या डोळ्यांसमोर असायचे. मात्र आता मल्लखांब जगभरात पसरला आहे. त्यामुळे मल्लखांबपटूंनी अर्जुन पुरस्कारासह अन्य प्रतिष्ठित पुरस्कारांवर मोहोर उमटवण्याचे ध्येय बाळगावे, हीच माझी आकांक्षा आहे.

(शब्दांकन : ऋषिकेश बामणे)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Develop young wrestler arjuna award earnings of two bronze medals akp

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या