रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झाझरिया याने भालाफेकमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. देवेंद्रचे हे दुसरे पॅरालिम्पिक सुवर्णपदक ठरले. याआधी देवेंद्रने अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती, पण यावेळी देवेंद्रने सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रमाला देखील गवसणी घातली.

वाचा: भालाफेकपटू देवेंद्रने पॅरालिम्पिकमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास

देवेंद्रने रिओमध्ये ६३.९७ मीटर लांब भालाफेक करून जागतिक विक्रम रचला आहे. याआधीचा विक्रम देखील देवेंद्रच्याच नावावर होता. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने ६२.१५ मी. भालाफेक केली होती. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील देवेंद्रने आजवर वैयक्तिक जीवनात अनेक आव्हानांचा सामना केला आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेची दोन सुवर्णपदके नावावर असलेल्या देवेंद्रबद्दलच्या १० गोष्टी-

१. देवेंद्र झाझरिया ८ वर्षांचा असताना त्याचा मित्रांसोबत खेळताना अपघात झाला होता. देवेंद्रला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड होती. जास्तीत जास्त वेळ तो मैदानात असायचा, असाच एके दिवशी खेळत असताना त्याला अपघाताला सामोरे जावे लागले. एका वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने देवेंद्रला ११,००० व्होल्ट क्षमतेचा झटका बसला होता.

२. दुर्घटनेत देवेंद्रचे शरीर मोठ्या प्रमाणावर भाजले गेले, यात त्याला आपला डावा हात देखील गमवावा लागला. पण प्रचंड इच्छाशक्ती आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे देवेंद्रने आपल्या अपंगत्वाला मागे टाकले. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी मोठा पाठिंबा दिला. माझ्यामुळे कुटुंबियांना होणारा त्रास त्यांनी कधीच दाखवून दिला नाही, उलट मला नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम केले. यामुळे मी जीवनात पुढे जाऊ शकलो, असे देवेंद्र सांगतो.

३. देवेंद्रने इयता दहावीत असताना पहिल्यांदा भाला उचलला. दुर्घटनेतून पूर्णपणे सावरल्यानंतर सततचा भालाफेकीचा सराव आणि प्रचंड मेहनतीने देवेंद्रने जिल्हास्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केले. आंतरमहाविद्यालयीन, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत देखील देवेंद्रने आपले नाव कोरले. सुरूवातीला देवेंद्रला पॅरालिम्पिक स्पर्धेबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.
४. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आर.डी.सिंह अर्थात देवेंद्रचे प्रशिक्षक यांनीच देवेंद्रची विशेष खेळाडूंसाठीच्या स्पर्धेची ओळख करून दिली. त्यानंतर आर.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रने भालाफेकीचे धडे गिरवले.

५. देवेंद्र झझारियाने २००४ साली अॅथेन्स पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला. सुवर्णपदकासह देवेंद्रने भालाफेकीत जागतिक विक्रमाची देखील नोंद केली होती. देवेंद्रने ६२.१५ मी. भालाफेक केला होता. त्यानंतर यंदा देवेंद्रने पुन्हा एकदा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. रिओ ऑलिम्पिकमध्ये देवेंद्रने ६३.९७ मी. लांब भालाफेक करून नव्या विक्रमाची नोंद केली.

६. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर देवेंद्रने २०१३ साली आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती.

७. अथेन्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतरही देवेंद्रची हलाकीच्या परिस्थितीशी झुंज देत होता. त्याला कोणताही आर्थिक मदत मिळाली नव्हती. भालाफेक खेळाप्रतीच्या देवेंद्रच्या योगदानाची २००४ नंतर हळूहळू दखल घेतली गेली. सरकार आणि खासगी प्रायोजक देखील देवेंद्रच्या मदतीसाठी धावून आले. देवेंद्रला सध्या गो-स्पोर्ट्स कंपनी सहकार्य करते.

८. २०१५ साली आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये देवेंद्रने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत देवेंद्रने रौप्य पदकाची कमाई केली होती.

९. २०१२ साली देवेंद्रला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळालेला पहिला पॅरा-खेळाडू म्हणून देवेंद्रला ओळखले गेले. त्यानंतर २०१४ साली देवेंद्रला सर्वोत्कृष्ट पॅरा-खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

१०. दोनवेळा सुवर्णपदक विजेत्या देवेंद्र झझारिया याच्याकडे आता १४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय पॅरा-स्पर्धेचा अनुभव गाठीशी आहे. भविष्यात आपल्यासारख्या विशेष युवा खेळाडूंना प्रशिक्षण देऊन भालाफेक खेळाचा प्रसार करण्याचे स्वप्न देवेंद्रचे आहे.