Dewald Brevis Baby AB No Look Six The Hundred: दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस, ज्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) म्हणूनही ओळखले जातं. तो आपल्या वादळी फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. सध्या तो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे. ‘लंडन स्पिरिट’ संघाकडून खेळताना ब्रेविसने जवळपास प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान, त्याने मारलेला एक ‘नो-लुक’ (no-look) षटकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने चाहत्यांना थक्क केलं आहे.
आजच्या काळातील अनेक फलंदाजांनी ‘नो-लुक’ शॉट खेळण्यात नैपुण्य मिळवलं असलं, तरी डेवाल्ड ब्रेविस ज्या प्रकारे हा फटका मारतो, तसं कौशल्य क्वचितच कोणाकडे दिसेल. शिवाय ब्रेविसने मारलेला हा षटकार ९७ मीटर लांब होता. सोशल मीडियावर या व्हीडिओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
रविवारी (९ ऑगस्ट) लंडन स्पिरिट आणि बर्मिंगहॅम फिनिक्स यांच्यातील सामन्यात त्याने एकापेक्षा एक कमालीचे फटके खेळले. पण त्याच्या नो लुक षटकाराने मैदान गाजवलं. फिरकीपटू रेहान अहमदच्या एका चेंडूवर त्याने ‘लॉन्ग-ऑन’च्या दिशेने एक जबरदस्त ‘नो-लुक’ षटकार खेचला. विशेष म्हणजे, ब्रेविसचा हा षटकार ९७ मीटर अंतराचा होता.
लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या अर्धशतकांच्या बळावर, लंडन स्पिरिटने बर्मिंगहॅम फिनिक्सचा १८ चेंडू बाकी असताना पराभव केला. लिव्हिंगस्टोनने ३० चेंडूंमध्ये ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. तर ब्रेविसने ३१ चेंडूंमध्ये ५५ धावा करत त्याला उत्तम साथ दिली; यात ९७ मीटर लांब एका ‘नो-लुक’ षटकाराचाही समावेश होता. द हंड्रेडमधील हा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला गेला होता. त्यामुळे या मैदानावर सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. ब्रेविसचा हा नो लूक षटकार पाहताच चाहत्यांनी एकच कल्ला सुरू केला.
Dewald Brevis No Look Six व्हीडिओ
लिव्हिंगस्टोन आणि ब्रेविस यांनी अवघ्या ४७ चेंडूंत १०३ धावांची भागीदारी रचली; मात्र, कर्णधार लिव्हिंगस्टोन ३० चेंडूंत ६६ धावा करून बाद झाल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. तोपर्यंत ‘स्पिरिट’ला विजयासाठी ३० चेंडूंत केवळ १३ धावांची गरज होती. त्यानंतर ब्रेविसने आक्रमक पवित्रा घेत रेहान अहमदच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावले आणि संघासाठी सात गडी राखून विजय निश्चित केला.
