Dewald Brevis Stunning Catch Virat Kohli Reaction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या जोडीने शतकी भागीदारी रचच भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडेसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली होती. पण डेवाल्ड ब्रेविसच्या अफलातून एकहाती झेलने चकित करत ऋतुराजला झेलबाद केलं. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड फलंदाजीला उतरला. रोहित शर्मा व विराट कोहलीने यापूर्वी १०३ चेंडूत १३६ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली होती. ऋतुराज गायकवाडने सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण या सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि फक्त ८ धावा करत झेलबाद झाला.
ओटनील बार्टमन २७वं षटक टाकण्यासाठी आला. ऋतुराज गायकवाड तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर होता. तो चेंडूवर कट मारत खेळण्यासाठी गेला, पण तिथे पॉईंटवर उभ्या असलेल्या ब्रेविसने अनपेक्षित झेल टिपला. ऋतुराजने फटका खेळताच ब्रेविसने उजव्या बाजूला झेप घेत एका हाताने चकित करणारा झेल टिपला. ब्रेविसने झेप घेताच उठून उडी मारत सेलिब्रेशन केलं.
विराट कोहलीही ब्रेविसचा झेप पाहताच आश्चर्यचकित झाला. विराटने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं. तर ब्रेविसने अवघ्या ०.३८ सेकंदांत रिएक्ट करत हा झेल टिपला.
