रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार झाल्यानंतर आता मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळख असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सनेही आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. आपण या पुढे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार नसल्याचं डिव्हिलियर्सने जाहीर केलं होतं. यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली आहे. 

 ए. बी. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेकडून ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. “हा एक विलक्षण प्रवास होता पण मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्याने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, एबी डिव्हिलियर्सच्या या निर्णयावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

धनश्री वर्माने लिहिले, “क्रिकेटशी जोडलेल्या माझ्या छोट्या प्रवासात अनेक आश्चर्यकारक कारणांसाठी मी तुम्हाला ओळखू शकले, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. क्रिकेटचा विचार केल्यास तुम्ही केवळ मिस्टर ३६० नाही तर एक विलक्षण व्यक्ती आहात. मी तुमच्याकडून व तूमच्या परीवाराकडून खूप काही शिकले आहे. तुम्ही माझे निवडलेले कुटुंब आहात. मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तसेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्यासोबत खेळलेले तुमचे सहकारी आणि खेळाडूच नाही तर तुमच्या चाहत्यांनाही तुमच्या उपस्थितीची आठवण येईल. तुम्ही सर्वांवर जो प्रभाव टाकला आहे तो नेहमीच कायम राहील.”

“आपलं नातं हे खेळा पलिकडचं”

धनश्री वर्माने ही लांबलचक पोस्ट लिहून एबी डिव्हिलियर्सला त्याच्या चमकदार खेळाची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण करून दिली आहे. याआधी विराट कोहलीनेही एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या निर्णयावर ट्विट केले होते. “आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी… तू जे काही (करियर) केलं आहेस त्याचा तुला फार अभिमान वाटला पाहिजे. भावा तू आरसीबीला जे काही दिलं आहे त्यासाठी तुला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे. आपलं नातं हे खेळा पलिकडचं आहे आणि ते कायमच राहिलं,” असं कोहलीने म्हटलं आहे.

हेही वाचा- RCB च्या चाहत्यांना मोठा धक्का! आधी विराटने कर्णधारपद सोडलं आणि आता डिव्हिलियर्सने….

“याचा (या निर्णयाचा) माझ्या मनाला फार त्रास होतोय पण मला माहितीय तू तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला घेतलाय, जसा तू नेहमीच घेतोस. फार सारं प्रेम,” असं विराटने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

निवृत्तीची घोषणा करताना डिव्हिलियर्स म्हणाला…

“अगदी अंगणामध्ये माझ्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळण्यापासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने खेळतो. आता वयाच्या ३७ वर्षी ती (उत्साहाची) ज्वाला त्याच तेजाने तेवत नाही. हे सत्य आहे आणि मला याचा स्वीकार करायलाच हवा. हे अचानक वाटत असलं तरी तसं नाही. म्हणूनच मी आज ही (निवृत्तीची) घोषणा करतोय,” असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.

“क्रिकेट हा खेळाने मला कायमच फार मायेनं जवळ केलं आहे. मग ते टायटन्ससाठी खेळणं असो, दक्षिण आफ्रिकेसाठी किंवा आरसीबीसाठी असू किंवा जगात कुठेही असो, या खेळाने मला विचारही करता येणार नाही असे अनुभव आणि संधी दिल्या. यासाठी मी कायमच आभारी राहीन,” असं डिव्हिलियर्स म्हणाला.