मेलबर्नमधील तिसरा कसोटी सामना संपल्यावर महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृती घेण्याचा निर्णय घेतला आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, पण याला अपवाद भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आहे. कारण द्रविडला धोनीने घेतलेली निवृत्ती हा अचानक घेतलेला निर्णय वाटत नाही. धोनी बोलण्यापेक्षा कृतीवर अधिकाधिक भर द्यायचा, त्याचा निवृत्तीचा निर्णयदेखील त्याच्या वर्तनाला साजेसा असल्याचे मत द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘धोनीने कर्णधारपद भूषवताना जास्त भाष्य केले नाही, पण त्याने कृतीमधून सारे काही दाखवून दिले. त्याने कधीही किचकट गोष्टी केल्या नाहीत. ज्या गोष्टी त्याच्या पचनी पडत नसत, त्या गोष्टी तो कुणालाही करायला सांगत नसे. त्याने कर्णधारपद कसे निभावले जावे, याचा उत्तम वस्तुपाठ सादर केला. त्याची निवृत्तीही त्याच्या वर्तनाला साजेशी अशीच होती, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मी क्रिकेटचा आनंद लुटला,’’ असे द्रविड म्हणाला.
द्रविड पुढे म्हणाला की, ‘‘धोनीने कप्तानी करताना कधीही मागे पाऊल टाकले नाही. धोनी जास्त बोलका नव्हता, पण जे काही बोलायचा त्यामधून त्याने साऱ्यांच्या मनामध्ये सन्मान मिळवला होता. तो संघासाठी नेहमीच प्रेरणादायी होता.’’