आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान यांना सामन्याच्या मानधानाच्या अनुक्रमे ७५ टक्के आणि ५० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
धोनी आणि रहमान यांनी आयसीसीच्या कलम क्र. २.२.४चा भंग केल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात अयोग्य पद्धतीने किंवा जाणीवपूर्वक शरीराचा संपर्क येण्याबाबत हा नियम आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्यावरील आरोपाचा स्वीकार न केल्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांना संघव्यवस्थापकासोबत पुन्हा सुनावणीसाठी बोलावण्यात आले.
गुरुवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करीत असताना धोनी एकेरीत धाव घेत असताना रहमान त्याच्या वाटेत आला त्या वेळी ही घटना घडली. टीव्ही रिप्लेच्या पाहणीनुसार धोनीने त्याला जाणीवपूर्वक ढकलल्याचे निष्पन्न झाले आहे, असे सामनाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या घटनेनंतर उपचारासाठी रहमानने मैदान सोडले होते.
सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी मैदानी पंच रॉड टकर आणि इनामूल हक मोनी यांच्यासह धोनी, भारताचे संघ संचालक रवी शास्त्री आणि व्यवस्थापक बिस्वरूप डे यांना गुरुवारी रात्री सुनावणीसाठी बोलावले होते. धोनीने जाणीवपूर्वक गोलंदाजाला ढकलले नव्हते. धोनीने आपला कोपरा धाव घेताना पुढे ठेवला नव्हता, त्याला फक्त धाव पूर्ण करायची होती, असे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून बचाव करताना सांगण्यात आले.
त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी रहमान आणि संघ व्यवस्थापक खलीद महमूद सुजान यांना बोलावले होते. ‘‘मी धोनीच्या वाटेत उभा होतो, ही माझी चूक होती,’’ असे रहमानने एका बंगाली दैनिकाकडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते. रोहित शर्मा फलंदाजी करीत असतानाही रहमानने हीच चूक केली होती. मात्र सामनाधिकाऱ्यांसमोर रहमानने आपली चूक कबूल केली. त्यामुळे त्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आली.