What did Sandeep Patil clarify about Dhoni and Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भारतीय संघातील क्रिकेट कारकिर्द संपण्यामागे महेंद्रसिंह धोनीचा हात आहे, असा आरोप युवराजचे वडील योगराज सिंग सातत्याने करत असतात. मात्र यात खरेच तथ्य आहे का? की योगराज सिंग यांचा आरोप गैरसमजातून झालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आता अखेर मिळाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चार वर्ष मुख्य निवडकर्ता राहिलेल्या संदीप पाटील यांनीचा याचा खुलासा केला आहे.

संदीप पाटील यांनी चार वर्ष बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहिले. त्यांच्या काळात दिग्गज क्रिकटपटूंना संघातून बाहरेचा रस्ता दाखविला गेला. यामध्ये युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांचा प्रमुख समावेश आहे. याबद्दल त्यांनी अनेक काळ मौन बाळगले. मात्र नुकतेच त्यांनी विकी ललवानी यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींचा खुलासा केला आहे.

धोनी आणि युवराजबद्दल काय म्हणाले?

योगराज सिंग यांनी सातत्याने केलेल्या आरोपाबाबत संदीप पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “धोनीही कधीही याबद्दल काही सांगितले नाही. निवड समितीच्या बैठक असो, दौरा किंवा सामन्यादरम्यान कधीही धोनीने युवराजला वगळण्याबाबत वाच्यता केली नाही”

तसेच निवड समितीने जेव्हा युवराजला वगळण्याचा निर्णय घेतला तेव्हा धोनीने निदान त्याचा विरोध केला का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, त्याला निवड समितीवर पूर्ण विश्वास होता. तो काहीही बोलला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून योगराज सिंग धोनीवर आरोप करत आहेत. याबद्दल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, वडिलांना आपल्या मुलाबद्दल काळजी वाटणे, त्याच्याबद्दलच्या भावना तीव्र असणे चुकीचे नाही. परंतु त्यांचा रोख चुकीच्या दिशेला आहे.

योगराज सिंग यांचा आरोप काय?

योगराज सिंग यांनी आजवर अनेकदा एमएस धोनीवर आगपाखड केली आहे. नुकतेच त्यांनी स्विच युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले, “मी धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने आरशात पाहावे. तो नक्कीच एक चांगला क्रिकेटपटू आहे. त्याबद्दल मी त्याला सलाम करतो. पण त्याने माझ्या मुलाबरोबर जे केले, ते विसरता येणे शक्य नाही. त्याबद्दल त्याला माफी नाही.”

युवराज सिंगची कारकिर्द

युवराज सिंगने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. विशेषतः २००७ च्या पहिल्याच टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकल्यानंतर त्याची सिक्सर किंग अशी ओळख झाली होती. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. भारताने हा विश्वचषक जिंकला होता. ज्यामध्ये त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला.

२०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराजला कर्करोगाची लक्षणे जाणवू लागली. स्पर्धेनंतर त्याच्यावर उपचार झाले. अत्यंत कठीण काळातून जात त्याने या आजारावर यशस्वी मात केली आणि २०१२ मध्ये पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. पुढे १० जून २०१९ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.