एखादी मॅच जिंकल्यावर त्या टीमचे खेळाडू मैदानावर जल्लोष करतात. चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येतं आणि त्या अविस्मरणीय मॅचची एखादी आठवण आपल्याकडे राहावी यासाठी जिंकलेल्या टीमचे खेळाडू मैदानावरचे स्टंप्स उचलून घेऊन जातात

अगदी गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दृष्य क्रिकेटच्या मैदानालर कायम दिसायचं. काळ बदलला तसा क्रिकेटच्या साधनांमध्ये बदल घडले. आता हाय फाय झालेले स्टंप्स उचलून न्यायलाही आयोजकांकडून बंदी होऊ लागली. आणि क्रिकेटमधला एक मजेदार प्रकारच संपला. मॅच जिंकल्यानंतर पळवलेले असे स्ट्ंप्स एखाद्या प्लेअरला भेट देणं हा त्या प्लेअरचा बहुमान समजला जायचा. पण यापुढे तसं होणार नाही.

पण तरीही भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने नवीन कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या विराट कोहलीचा इंग्लंडविरूध्दची सीरिज जिंकल्यावर खास पध्दतीत सन्मान केला.

विराट कोहलीला कॅप्टनशिपचं दडपण अजिबात येत नाहीये असंच दिसतंय. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने शानदार विजय मिळवलेत. हे सगळं करत असताना त्याची बॅटिंगसुध्दा जबरदस्त झालीये. कॅप्टन म्हणून १००० रन्स सर्वात जलदगतीने काढणारा बॅट्समन म्हणून त्याने साऊथ आफ्रिकेच्या एबी डिव्हिलीयर्सला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केलाय. त्याने फक्त १७ इनिंग्जमध्ये ही किमया केलीये. एबी डिव्हिलियर्सला तिथवर पोचायला १८ इनिंग्ज लागल्या.

भारतीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनशिपची जबाबदारी एवढ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या विराटचं कॅप्टन कूल धोनीने कौतुक केलं नसतं तरच नवल होतं. भारताचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यावर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच सीरिज जिंकली. या सीरिजमध्ये इंग्लंडला भारताने २-१ ने मात दिली. कटकमध्ये झालेल्या वनडे नंतर याबद्दलच धोनीने विराट कोहलीचं कौतुक केलं ते एक विशेष भेट देत.

कटक वनडेमध्ये भारताने विजय मिळवल्यावर अंपायरनी मॅचचा बाॅल उचलत पॅव्हेलियनकडे जायला सुरूवात केली. त्यावेळी धोनीने या अंपायर्सना थांबवत त्यांच्याकडून मॅचचा बाॅल घेण्याची परवानगी मागितली. हा बाॅल दिलदार धोनीने विराटच्या हातात देत त्याला ही भेट असल्याचं सांगितलं.

कॅप्टन धोनीशी आधीपासूनच दोस्ती असणाऱ्या विराटला ही भेट अनपेक्षित होती. ही भेट दिल्याबद्दल धोनीला त्याने धन्यवाद दिले आणि पॅव्हेलियनमध्ये गेल्यावर धोनीची या बाॅलवर त्याने स्वाक्षरीही घेतली.

वाचा- “अरे साॅरी, कॅप्टन तू आहेस नाही का?”

दिसायला छोट्याशा दिसणाऱ्या या भेटींमध्ये खूप मोठा दिलदारपणा दडलाय. एखाद्या सेनानीने आपल्या छातीवरची पदकं अभिमानाने मिरवणं आणि आपण पराक्रम गाजवलेल्या सीरिजमध्ये खेळला गेलेला बाॅल आपल्याला आपल्याच माजी कप्तानाने देणं यामागे हीच भावना, हाच गौरव आहे