Dhurv Jurel Catch: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३२ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थानने लखनौला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत केलं आहे. लखनौला विजयासाठी १६० धावांचा पाठलाग करायचा होता. पण लखनौच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यामुळे हा सामना लखनौला ४० धावांनी गमवावा लागला आहे. यादरम्यान ध्रुव जुरेल यष्टीमागे भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले होते. शेवटी मयांक यादव ९ व्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी आला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून १८ वे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयांक यादवने दमदार चौकार मारला. त्यानंतर पुढचाच चेंडू आर्चरने गुड लेंथवर टाकला. या चेंडूवर मयांक यादव थर्ड मॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूची गती कमी होती. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क तर झाला पण चेंडू ध्रुव जुरेलच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. हा चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने जात होता. पण नेमकं तेव्हाच ध्रुव जुरेलने डाईव्ह मारली आणि एका हाताने भन्नाट झेल घेतला.

लखनौच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौसमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. लखनौची फलंदाजी पाहता, हे आव्हान फार मोठं नव्हतं. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. लखनौकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने अर्धशतकी खेळी केली. तर आयुष बदोनी, ऋषभ पंत आणि एडेन मारक्रम हे तिघेही शून्यावर माघारी परतले.त्यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने २२ धावांची खेळी केली. तर हिम्मत सिंगने १५ धावा केल्या. मुकुल चौधरी अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. लखनौचा संघ विजयापासून ४० धावा दूर राहिला.

राजस्थानने केल्या १५९ धावा

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पण राजस्थानलाही अपेक्षेप्रमाणे सुरूवात करता आली नव्हती. यशस्वी जैस्वाल अवघ्या २२ धावा करून माघारी परतला. तर वैभव सूर्यवंशी अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. ध्रुव जुरेल शून्यावर माघारी परतला. रियान परागने २० धावांचे योगदान दिले. तर शिमरन हेटमायरने २२ धावांची खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजाने नाबाद ४३ धावांची खेळी केली. यासह राजस्थानने २० षटकांअखेर ६ गडी बाद १५९ धावा केल्या.