Dhruv Shorey Century: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये भारताच्या फलंदाजांनी हाहाकार केला आहे. यादरम्यान विदर्भ संघातील फलंदाजाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. २६ डिसेंबरला राजकोट येथे हैदराबाद आणि विदर्भ यांच्यात झालेल्या सामन्यात विदर्भ संघाने ८९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ३३ वर्षीय खेळाडूने शतकी खेळी करत संघाच्या विजयाच्या पाया रचला.
विदर्भचा फलंदाज ध्रुव शोरेने १०९ धावांची शानदार खेळी करत लिस्ट ए क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. हा विक्रम भारताचा खेळाडू एन जगदीशनच्या विक्रमाची बरोबरी साधली. ध्रुव शोरे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग राहिला आहे.
शोरेने हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकावलं. लिस्ट ए क्रिकेटमधील हे त्याचे सलग पाचवं शतक ठरलं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम आता संयुक्तपणे दोन भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावून एन जगदीसनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
शोरेची सलग पाच शतकांची मालिका २०२४-२५ विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत सुरू झाली. त्याने क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये शतकं झळकावली. त्यानंतर त्याने या हंगामात विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बंगालविरुद्ध १२५ चेंडूत १३६ धावांची शानदार खेळी केली.
आता, हैदराबादविरुद्ध, त्याने ७७ चेंडूत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ६ षटकार लगावले. या खेळीसह, शोरेने आपला वादळी फॉर्म कायम ठेवत टीम इंडियासाठी दावा ठोकला आहे.
सलग सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर चार खेळाडू आहेत, ज्यामध्ये करुण नायर, देवदत्त पडिकल, कुमार संगकारा आणि अल्विरो पीटरसन यांची नावं आहेत, ज्यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग चार शतकी खेळी खेळल्या आहेत. दरम्यान, कुमार संगकारा हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार शतकं केली आहेत.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ३६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला विदर्भने ४९.२ षटकांत २७६ धावांवर रोखलं. विदर्भाचा कर्णधार हर्ष दुबेने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत १० षटकांत ३९ धावा देत तीन बळी घेतले. नचिकेत आणि यश कदम यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.
