पीटीआय, स्टॉकहोम : यंदाच्या हंगामाला शानदार प्रारंभ करणारा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून गुरुवारी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकाची अपेक्षा करण्यात येत आहे.

तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावले. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने ८६.३० मीटर अंतर गाठत सुवर्णपदकाची कमाई केली. फिनलंडमधील या दोन्ही स्पर्धामधील कामगिरीमुळे नीरजच्या हंगामाला सकारात्मक सुरुवात झाली आहे. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे क्युर्टानेच्या स्पर्धेतील तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

ऑगस्ट २०१८मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवले होते. त्या वेळी त्याने ८५.७३ मीटर अंतरावर भाला फेकला होता. या स्पर्धेनंतर प्रथमच नीरज डायमंड लीगमध्ये सहभागी होत आहे. त्याने २०१७ मधील तीन व २०१८ मधील चार अशा सात डायमंड लीगमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय लांब उडी प्रकारात भारताचा मुरली श्रीशंकरसुद्धा सहभागी होणार आहे.