scorecardresearch

डायमंड्स लीग विजेत्या नीरजची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार

अ‍ॅथलेटिक्स विश्वातील प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नीरज चोप्राने दुखापतीच्या कारणास्तव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे.

डायमंड्स लीग विजेत्या नीरजची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

नवी दिल्ली : अ‍ॅथलेटिक्स विश्वातील प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नीरज चोप्राने दुखापतीच्या कारणास्तव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नीरजने डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात ८८.४४ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. ही कामगिरी करणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला. दोनच दिवसांपूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्व राज्यांना त्यांचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळले पाहिजेत, अशा सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नीरजच्या निर्णयाने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

स्नायूची दुखापत अजून पूर्ण बरी झालेली नाही. प्रशिक्षक डॉ. क्लॉस बाटरेनेईट्झ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतल्याचे नीरजने स्पष्ट केले. ‘‘माझ्या नियोजनानुसार डायमंड्स लीगचा अंतिम टप्पा ही माझ्या चालू हंगामातील अखेरची स्पर्धा होती. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतही मी सहभागी होणार होतो. मात्र, ही स्पर्धाच रद्द झाली. त्यामुळे मला नव्या हंगामासाठी मोठी विश्रांती मिळणार होती. मात्र, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ऐनवेळी जाहीर झाल्या. त्यामुळे  मी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला,’’ असे चोप्राने म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diamonds league winner neeraj withdraws from national games ysh