आशिया चषकाचं जेतेपद आणि वाद यांचं नातं रविवारी दुबईत पुन्हा एकदा घट्ट असल्याचं सिद्ध झालं. दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम मुकाबल्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ७२ धावांनी नमवत जेतेपदावर नाव कोरलं. भारतीय संघाचं आशिया चषक स्पर्धेचं हे आठवं जेतेपद आहे. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघाने जेतेपदाचा करंडक उचलल्याचं तसंच जेतेपदासह आनंदा साजरा केल्याचं चाहत्यांना दिसलंच नाही. याचं कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी.
नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. काही महिन्यांपूर्वी पुरुष संघाने आशिया चषकाचं जेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र त्यावेळी सूत्रसंचालक सायमन डूल यांनी भारतीय संघ जेतेपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ते जेतेपद आजही आशियाई क्रिकेट परिषदेच्या दुबईस्थित कार्यालयात आहे. भारतीय पुरुष संघाला जेतेपद पटकावूनही ते मिळालेलं नाही.
अंतिम मुकाबला आटोपल्यानंतर तब्बल पाऊण तासाने पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू परवेझ महारुफ पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होते. पुरस्कार सोहळ्याला यजमान दुबई अर्थात युएई बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख नक्वी उपस्थित असल्याने भारतीय संघ जेतेपद त्यांच्या हस्ते स्वीकारणार का याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. उपविजेत्या श्रीलंका संघाला सन्मानित करण्यात आलं. याव्यतिरिक्त फायनलसाठी कार्यरत सामनाधिकारी, पंचांनाही गौरवण्यात आलं. मात्र विजेत्या भारतीय संघाला पदक देऊन तसंच जेतेपदाच्या करंडकासह गौरवण्यात आलं नाही. श्रीलंका संघ आणि पंच-सामनाधिकारी यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर महारुफ यांनी पुरस्कार सोहळा संपल्याचं जाहीर केलं. सामन्यासाठी तज्ज्ञ म्हणून स्टुडिओत भारताच्या माजी कर्णधार मिताली राज आणि अंजुम चोप्रा उपस्थित होत्या. मात्र त्यांनीही यासंदर्भात भाष्य केलं नाही.
भारतीय संघव्यवस्थापनाने नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली का? याविषयी कोणीही अधिकृत पातळीवर भाष्य केलं नाही. या सामन्याला बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया तसंच उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. सामना संपल्यानंतर साईकिया यांनी नंदनी शर्माला पदकाने सन्मानित केलं. मात्र हे पदक कशासाठी याचीही माहिती देण्यात आली नाही.
पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी भारतीय संघ व्यासपीठाच्या आसपासही नव्हता अशी माहिती समोर येते आहे. सामन्यादरम्यान नक्वी यांनी देवजीत साईकिया आणि राजीव शुक्ला यांच्याशी संवाद साधला होता.
सामन्यात काय झालं?
वर्ल्डकपविजेत्या भारतीय महिला संघाने आशियाई उपखंडातही अव्वल असल्याचं सिद्ध करत आशिया चषक स्पर्धच्या जेतेपदावर नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आणि अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने आठव्यांदा महिला आशिया चषकाच्या जेतेपदाची कमाई केली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची तडाखेबंद शतकी भागीदारी या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२, २०१६, २०२२ मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
हरमनप्रीत कौरने फायनलच्या मुकाबल्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दुबईच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी १२९ धावांची तडाखेबंद भागीदारी केली. या भागीदारीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शफाली ३९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा करून बाद झाली. थोड्याच वेळात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्मृती बाद झाली. तिने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत (१४), ऋचा घोष (१७) आणि कमालिनी (१५) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. भारतीय संघाने १८३ धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा डाव १११ धावांतच आटोपला. श्री चरणीने ४ तर दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शफाली वर्मा आणि स्मृती मानधना अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक विकेट्सच्या यादीत दीप्ती शर्मा २४ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. स्पर्धेत मालिकावीर म्हणून या तिघींपैकी एकीला पुरस्कार मिळणं अपेक्षित होतं मात्र त्यासंदर्भातही घोषणा करण्यात आली नाही.
