काही तासांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला होता. पण आता त्यांनी दबावतंत्राचा उपयोग करून मला राजीनामा द्यायला लावला, असा सूर बदलला आहे.
‘ सध्याच्या घडीला मला बीसीसीआयमध्ये काम करणे फार अवघड करून ठेवले होते. मला कोणाचेही नावे घ्यायची नाहीत. पण मी एवढे नक्कीच सांगू शकतो की, राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव वाढवण्यात आला होता,’ असे मनोहर यांनी सांगितले.
लोढा समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यामुळे मनोहर यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात होते, पण मनोहर यांनी ही अफवाच असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘बीसीसीआयमधील कार्यपद्धती मला माझ्या पद्धतीने हाताळायची होती. त्यामध्ये माझी काही तत्त्वे होती, याशिवाय मला अन्य काहीही सांगायचे नाही. माझी प्रतिमा मलिन व्हावी, असे मला वाटत नाही. बीसीसीआयने अन्य कोणाच्या आधिपत्याखाली चालावे, हे मला अमान्य होते.’
जगमोहन दालमिया यांना आपल्या अखेरच्या काळामध्ये कामकाज करणे शक्य नव्हते. त्या वेळी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हे बीसीसीआयचे सारे व्यवहार पाहत होते. त्यामुळे दालमिया यांच्या निधनानंतर ठाकूर बीसीसीआयचे अध्यक्ष होतील, असे साऱ्यांनाच वाटत होते. पण त्या वेळी शशांक मनोहर यांना अध्यक्ष बनवण्यात आले. या कार्यकाळामध्ये मनोहर यांना बीसीसीआयच्या अन्य पदाधिकाऱ्यांपासून चांगला पािठबा मिळत नसल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी मनोहर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर दौरा अर्धवट सोडल्यानंतर लादण्यात आलेला जवळपास ४ कोटी २० लाख रुपयांचा दंड माफ केला होता. त्यानंतर मनोहर यांच्याविरोधात बीसीसीआयमध्ये वातावरण चांगलेच तापले असल्याचे म्हटले जात होते.
बीसीसीआयमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘मनोहर हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, हे आम्हाला काही दिवसांपूर्वीच समजले होते. पण हा राजीनामा ते स्वेच्छेने देत आहे की दबावतंत्रामुळे, या गोष्टींचा आता विचार करून काहीच उपयोग नाही.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did not quit bcci to contest icc chairman election
First published on: 12-05-2016 at 04:27 IST