Vaibhav Sooryavanshi Debut Cap: ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर शनिवारी इतिहास घडला. ज्या क्षणाची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. यासह सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत तो भारतीय संघासाठी पदार्पण करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने २ खणखणीत षटकार खेचले, पण मोठी खेळी करू शकला नाही. पण १४ धावांची खेळी देखील ऐतिहासिक ठरली. कारण क्रिकेट विश्वाने असं काही पाहिलं, जे याआधी कधीच घडलं नव्हतं. दरम्यान या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करू शकते, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
नेमकं काय घडलं?
वैभव सूर्यवंशी अवघ्या १५ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात आजवर कुठल्याही खेळाडूने भारतासाठी पदार्पण केलं नव्हतं. त्यामुळे हा क्षण खूप खास होता. टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्माने १२२ क्रमांकाची कॅप वैभवच्या हाती दिली. पदार्पणाची कॅप स्वीकारल्यानंतर वैभवच्या डोळ्यात पाणी होतं. पण सामन्यानंतर त्याच्याकडून एक चूक झाली असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की, वैभवने सामना झाल्यानंतर आपल्या पदार्पणाची कॅप एका चाहत्याला दिली. हे नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
नेमकं सत्य काय?
वैभवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल आणि तिलक वर्मा हे तिन्ही फलंदाज सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसून येत आहेत. त्यावेळी वैभव सूर्यवंशी पुढे येतो आणि गॅलरीतून इशारा करतो. आधी तो डाव्या हाताने आपल्या चाहत्याकडे बोट दाखवतो. त्यानंतर उजव्या हातात त्याची पदार्पणाची कॅप आहे. ही कॅप घेऊन तो इशारा करतो.
यावरून असं म्हटलं जातंय की, त्याने आपली कॅप चाहत्याला दिली. पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅप त्याच्याकडेच आहे. तो कॅप न देताच ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसतोय. तसेच बीसीसीआयकडूनही कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होत आहे.
