सचिन तेंडुलकर आणि वासिम अक्रम या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं केलं. सचिन हा आपल्या नजाकतभऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जायचा, तर वासिम अक्रमने आपल्या भेदक माऱ्याने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली होती. मैदानाबाहेर सचिन आणि वासिम हे दोघं चांगले मित्र असले तरीही मैदानात या दोघांमध्येही चांगलीच खुन्नस असायची. सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या पहिल्याच सामन्यात वासिम अक्रमने सचिनची, आईला विचारुन आलायस ना? असा खोचक प्रश्न विचारुन खिल्ली उडवली होती. India Today वृत्तसमुहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता.

वयाच्या १६ व्या वर्षी १९८९ साली सचिनने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आपलं पदार्पण केलं. यादरम्यान अक्रमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. यावेळी सचिनची पाकिस्तानी खेळाडूंमध्ये चर्चा होती. आम्ही सचिनबद्दल ऐकलं होतं, त्याच्या फलंदाजीविषयीही आम्ही थोडी माहिती घेतली होती. मात्र आम्ही त्याला चिथवण्याचा प्रयत्न केला. तो पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा मी त्याला, आईला विचारुन आलायस ना? असं विचारत त्याचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला होता. अक्रम सचिनविषयीच्या जुन्या आठवणींबद्दल बोलत होता.

दरम्यान सध्या सुरु असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ १९ सप्टेंबरला समोरासमोर येणार आहेत. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात हाँग काँगवर मात केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजयासाठीचा प्रबळ दावेदार असल्याचंही वासिम म्हणाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारे सामने नेहमी रंगतदार होत असतात, त्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.