भारताचा सर्वाधिक अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल, अशी प्रतिक्रिया माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

३८ वर्षीय धोनी गतवर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अखेरचा सामना खेळला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना अद्याप कोणत्याही सामन्यात धोनीचे दर्शन झालेले नाही. त्यातच आता करोनामय स्थितीमुळे क्रिकेटचे सामने कधी सुरू होतील, हेच ठाऊक नसल्याने धोनीसाठी पुढील काळ अधिक खडतर असेल, असे प्रसाद यांना वाटते.

‘‘जवळपास गेल्या १० महिन्यांपासून धोनी क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच करोनाचे संकट टळल्यावर संपूर्ण विश्वाचे ट्वेन्टी-२० विश्वचषकावर लक्ष असेल. अशा परिस्थितीत धोनीने इतक्या कमी अवधीत संघात पुनरागमन करणे अशक्यच वाटते. किंबहुना त्याची आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० प्रकाराची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे, असे म्हणायला हरकत नाही,’’ असे ५० वर्षीय प्रसाद म्हणाले.

‘‘धोनीच्या तंदुरुस्तीविषयी मला किंचितही शंका नाही. परंतु एखादा क्रीडापटू चाळिशीकडे मार्गक्रमण करताना आपसूकच त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या जातात. त्यामुळे धोनीला स्वत:ची तंदुरुस्ती जपण्यासोबतच संघ व्यवस्थापन आणि कर्णधार यांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल,’’ असेही प्रसाद यांनी सांगितले.

त्याशिवाय धोनीने संघात पुनरागमन केल्यास त्याला यष्टिरक्षकाची भूमिका न देता फलंदाजीतही पाचव्या क्रमांकावर पाठवावे. धोनीऐवजी अन्य युवा खेळाडूकडे यष्टिरक्षण तसेच हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करण्याची सूत्रे सोपवावी, असेही प्रसाद यांनी सुचवले.

स्वत:वरील विश्वास हीच धोनीची ताकद – डय़ू प्लेसिस

नवी दिल्ली : कोणताही निर्णय घेताना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवणे, हीच महेंद्रसिंह धोनीची सर्वात मोठी ताकद आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने व्यक्त केले. ‘‘प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या मनात काय चालले आहे, हे धोनीला पक्के ठाऊक असते. त्यामुळेच बहुतांश वेळा तो गोलंदाज अथवा संघातील अन्य खेळाडूंसह मैदानावर चर्चा करून वेळ घालवण्यापेक्षा स्वत:च निर्णय घेतो. त्याने घेतलेले निर्णय ९९ टक्के अचूक असतात,’’ असे डय़ू प्लेसिस म्हणाला.

.. तर क्रिकेटपटूंचा सराव सुरू -धुमाळ

देशातील टाळेबंदीचे र्निबध हटवल्यास १८ मेपासून नामांकित क्रिकेटपटूंना कौशल्यावर आधारित सराव सुरू करता येईल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी व्यक्त केले आहे.

‘क्रीडात्मक सामने पुन्हा सुरू करण्याचा आराखडा’ या विषयावर धुमाळ म्हणाले, ‘‘केंद्र सरकारकडून १८ मेनंतर क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल मार्गदर्शक तत्त्वांच्या सूचना जारी केल्या जातील अशी अपेक्षा आहे. ‘बीसीसीआय’ही क्रिकेटपटूंचा कौशल्यावर आधारित मैदानी सराव कसा सुरू होईल, याकडे गांभीर्याने पाहात आहे.’’ ‘‘खेळाडूंना प्रवास करता येणार नाही. त्यामुळे निवासस्थानाजवळ मैदानावर त्यांना सराव सुरू करता येईल. ‘बीसीसीआय’ सरकारच्या संपर्कात आहे,’’ असे धुमाळ यांनी सांगितले.