पीटीआय, अहमदाबाद : भारतीय संघाच्या यशात मोठे योगदान देण्यात येणारे अपयश मला सतावत होते. माझ्याकडून सर्वानाच खूप अपेक्षा आहेत आणि जेव्हा फलंदाज म्हणून तुमच्या धावा होत नाहीत, तेव्हा या अपेक्षांचे दडपण जाणवते. अखेर कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवल्याचा आनंद आहे, असे मनोगत तारांकित फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले.
अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात कोहलीने १८६ धावांची अप्रतिम खेळी साकारली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील २८वे शतक होते. त्याला या शतकासाठी तीन वर्षांहूनही अधिक काळ वाट पाहावी लागली. त्याने कसोटीतील यापूर्वीचे शतक नोव्हेंबर २०१९मध्ये साकारले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीनंतर कोहलीने भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी खास बातचीत केली. याची चित्रफीत ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केली.
‘‘फलंदाज म्हणून तिहेरी आकडा गाठण्याची तुमच्यात भूक असते. शतक होत नसल्यास तुम्ही हताश होता. स्वत:लाच प्रश्न विचारता. मलाही कामगिरीची काहीशी चिंता होती. मी ४०-४५ धावा करून खूश होणारा खेळाडू नाही. संघासाठी मोठे आणि महत्त्वाचे योगदान देणे मी माझे कर्तव्य मानतो. मी जेव्हा ४० धावांचा टप्पा गाठतो, तेव्हा त्याचे १५० धावांच्या खेळीत रूपांतर करण्याचा मला विश्वास असतो. मात्र, मला शतकासाठी खूप काळ वाट पाहावी लागली. हे अपयश मला सतावत होते. मला अपेक्षांचे दडपण जाणवत होते. मी यापूर्वी अनेकदा कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून दिले आहेत. मात्र, गेल्या काही काळात माझ्याकडून अपेक्षित धावा होत नव्हत्या आणि हे अपयश पचवणे अवघड जात होते,’’ असे कोहलीने सांगितले.
अपेक्षांचे दडपण हाताळणे किती अवघड होते असे द्रविडने विचारले असता कोहली म्हणाला, ‘‘माझ्यासाठी मधला काळ फार कठीण होता. हॉटेलच्या खोलीतून बाहेर निघाल्यापासून भेटणारा प्रत्येक व्यक्ती, संघाच्या बसचा चालक, भेटणारे सर्वच चाहते ‘आम्हाला तुझ्याकडून शतकाची अपेक्षा आहे,’ असे सांगायचे. ही गोष्ट सतत माझ्या डोक्यात असायची. हे अपेक्षांचे दडपण हाताळणे काही वेळा फार अवघड होते. मात्र, दीर्घ काळापासून क्रिकेट खेळत असल्याने या दडपणातही चांगली कामगिरी कशी करायची हे मला ठाऊक आहे. मी मोठी खेळी करू शकलो याचा आनंद आहे.’’
खेळीदरम्यान दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा -द्रविड
कोहली १८६ धावांची खेळी करण्यासाठी ३६४ चेंडू खेळले. त्याने साडेआठ तासांहूनही अधिक वेळ फलंदाजी केली. त्याने या खेळीदरम्यान दाखवलेल्या संयमाची द्रविडने स्तुती केली. ‘‘मी विराटच्या अनेक शतकी खेळी टीव्हीवर पाहिल्या आहेत. मात्र, मी १५-१६ महिन्यांपूर्वी प्रशिक्षक झाल्यापासून विराटने कसोटीत शतक केले नव्हते. त्यामुळे मी त्याचे शतक ड्रेसिंग रूममध्ये बसून पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो. अखेर तो क्षण मला अनुभवता आला. या खेळीदरम्यान त्याने बाळगलेला संयम वाखाणण्याजोगा होता,’’ असे द्रविड म्हणाला.