Dilip Gavit Muhammed Basil win Gold Silver CWG 2026: ग्लासगो येथे सुरू असलेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या दिलीप म्हादू गावित आणि मोहम्मद बासिल यांनी पुरुषांच्या १०० मीटर टी४७ प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकत भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. दिलीप गावितने शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त वेग वाढवत १०.७१ सेकंदांत शर्यत पूर्ण केली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर मोहम्मद बासिलने १०.८३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावलं.
पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्यांदा एका स्पर्धेत दोन पदकं जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी महिलांच्या शॉटपुट एफ५७ प्रकारात शर्मिला धनकर आणि शिल्पा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकत भारताला दुहेरी यश मिळवून दिलं होतं. महाराष्ट्रातील नाशिकचा २३ वर्षीय दिलीप म्हादू गावित हा २०२२ च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. त्याने त्यावेळी पुरुषांच्या ४०० मीटर टी४७ प्रकारात सुवर्णपदक जिंकून आपली छाप पाडली होती.
टी४७ हा पॅरा अॅथलेटिक्समधील असा प्रकार आहे, ज्यामध्ये खेळाडूंच्या एका हातात अपंगत्व असतं. यामध्ये कोपराखालचा किंवा मनगटाचा हात गमावलेले किंवा त्याच प्रकारचं कार्यक्षमतेचं नुकसान झालेले खेळाडू सहभागी होतात. मात्र, त्यांच्या पायांची कार्यक्षमता सामान्य असते. दिलीप म्हादू गावित यांचा उजवा हात ते अवघे पाच वर्षांचे असताना आंब्याच्या झाडावरून पडल्यामुळे कापावा लागला होता. त्यानंतर वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी प्रशिक्षक वाजीनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅथलेटिक्समध्ये कारकिर्दीला सुरुवात केली.
सुमारे सहा वर्षांपूर्वी एका स्थानिक स्पर्धेत वाजीनाथ काळे यांची दिलीपवर नजर पडली होती. “प्रामाणिकपणे सांगायचं तर, त्यावेळी तो काही उत्कृष्ट धावपटू नव्हता किंवा त्याच्यात काही वेगळं दिसलं नव्हतं. मात्र, या मुलाला खेळात स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी मिळायला हवी, असं मला वाटलं. त्यासाठी त्याला औपचारिक आणि योग्य प्रशिक्षण मिळणं गरजेचं होतं,” असं काळे यांनी २०२१ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं.
दरम्यान, रौप्यपदक विजेता मोहम्मद बासिल याचा जन्मच उजव्या हाताशिवाय झाला होता. केरळच्या बासिलने वयाच्या १६व्या वर्षी स्प्रिंटिंगला सुरुवात केली. २०२६ हे वर्ष त्याच्यासाठी निर्णायक ठरलं. सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत (CWG Trials) टी४६-टी४७ अंतिम फेरीत बासिलने १०.६४ सेकंदांची वेळ नोंदवत दिलीप गावितला मागे टाकलं होतं. मात्र, ग्लासगोतील अंतिम शर्यतीत दिलीप गावितने दमदार पुनरागमन करत १०.७१ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकलं.
दिलीप गावित – कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष पॅरा ॲथलीट
या ऐतिहासिक कामगिरीसह दिलीप म्हादू गावित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. तसेच, महिलांच्या शॉटपुट एफ५७ प्रकारात शर्मिला धनकर हिने मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर पॅरा अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारा तो एकूण दुसरा भारतीय पॅरा खेळाडू ठरला.
